अजित पवार मंत्रिमंडळातून बाहेर

September 29, 2012 8:21 AM0 commentsViews: 33

29 सप्टेंबर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा आता राज्यपालांनीही स्वीकारला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजितदादांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. त्यावर राज्यपालांनी शिक्कामोर्तब केलं आहे. काल शुक्रवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित दादांचा राजीनामा मंजूर करुन मुख्यमंत्र्यांना मार्ग मोकळा करुन दिला होता. आता अजितदादा पक्षाच्या कार्यासाठी स्वत:ला वाहून घेणार आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी सकाळी मुंबईत दाखल झाले.. आणि अजितदादांच्या राजीनामानाट्यातला महत्त्वाच्या अंकाला सुरुवात झाली. मुंबईत दाखल होताच शरद पवारांनी सगळ्यांत आधी अजित पवारांची भेट घेतली. प्रफुल पटेलांच्या घरी झालेल्या बैठकीत सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. युवती मेळावे घेणार्‍या सुप्रियाताईंनी पहिल्यांदाच या राजीनामानाट्यात सहभाग घेतला..त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची आणखी एक बैठक झालीय. या बैठकीला अजित पवार, प्रफुल्ल पटेल, मधुकर पिचड, दिलीप वळसे-पाटिल असे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

या दोन्ही बैठका झाल्यावर.. विधिमंडळात राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक सुरू झाली. अजित पवारांना पाठिंबा देणारे अपक्ष आमदारही या बैठकीला हजर होते. या बैठकीत अजित पवारांनी भावनिक आवाहन करणारं भाषण केलं. ते म्हणाले.. 'शरद पवार हे माझं दैवत आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. पण, साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. कामं करणं हा काही गुन्हा असू शकत नाही. आम्ही प्रचंड कामं केली. पण केलेल्या कामांकडे मीडिया दुर्लक्ष करतं आणि भ्रष्टाचार्‍याच्या मुद्यावर वेगवेगळ्या विषयांना तोंड फोडतं. हे माझ्याविरोधात षड्‌यंत्र आहे. माझं काम मी प्रामाणिकपणे केलंय हे काळाच्या ओघात दिसेलच. आरोप दूर होईपर्यंत मी मंत्रिपद स्वीकारणार नाही. सरकारनं सिंचनावर लवकरात लवकर श्वेतपत्रिका काढावी.'यानंतर पवारांनी सर्व आमदारांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि अखेर दादांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब केला. अजित पवारांचं समर्थन करणार्‍या राष्ट्रवादीतल्या आणि अपक्ष आमदारांनीही हा निर्णय मान्य असल्याचं स्पष्ट केलंय.

आता मुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा स्वीकारून तो राज्यपालांकडे सोपवतील, ही फक्त औपचारिकता उरलीय. त्यानंतर राष्ट्रवादीचं काम करत राज्यभर फिरणारे अजित दादा काँग्रेससाठी जास्त त्रासदायक ठरण्याचीच दाट शक्यता आहे.

दादांचा राजीनामा : पुढे काय ?

- पक्षसंघटनेचं जाळं विस्तारणार- राज्यात ठिकठिकाणी सभा घेणार- सरकारच्या त्रुटींवर जोरदार भाष्य करणार- स्वत:ची ताकद वाढवणार- मर्जीप्रमाणे खातेबदल करून घेणार- अजित पवार प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात

close