पुढच्या वर्षी लवकर या !

September 29, 2012 5:38 PM0 commentsViews: 24

29 सप्टेंबर

'गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया…पुढच्या वर्षी लवकर या' असं साकडं घालून आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तांनी जडपावलांनी निरोप दिला. गेली दहा दिवस भक्तीमय वातावरणानं राज्य न्हावून निघालं. आज सकाळपासून राज्यभरात बाप्पाला निरोप देण्यासाठी सुरुवात झाली तीही जड अंत:करणानं..

मुंबई,पुणे,नाशिक,औरंगाबाद,रत्नागिरीसह संपूर्ण राज्यात मोठ्या जल्लोषात बाप्पाची मिरवणूक निघाली. मुंबईत लालबागचा राजा, गिरणगावचा राजा, गणेश गल्लीचा राजा आणि इतर मोठ्या गणपतींची मिरवणूक मोठ्या दिमाखात निघाली. ढोल ताशांचा गजर, डिजेचा दणदणाट, गुलालाची उधळणं आणि बाप्पाचा जयघोष…अशा उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक पुढे पुढे सरकत निघाली. मुंबईतील गिरगाव, जुहू , दादर चौपाटी आणि पवई तलाव परिसर गणेशभक्तांनी फुलून गेला. घरगुती गणपती, छोटीमोठी गणेशमंडळ गणेशाची आरती करुन बाप्पाचा अखेरचा निरोप घेतला जात होता. तर राजावर पुष्पवृष्टी, राजाचं मनमोहक रुप डोळ्यात साठवून घेतलं जातं होतं. तिकडे पुण्यात मानाच्या गणपतींची पारंपारीक पध्दतीने ढोल ताशांच्या गजरात निरोप देण्यात आला. शहरातील गणपतीच्या मिरवणुकीला मंडईतून सुरवात झाली. ग्रामदैवत असणार्‍या कसबा गणपती पालखीमध्ये पारंपरिक पद्धतीनं विराजमान होतो. त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासमोर आरती होऊन मिरवणुकीला सुरवात होते. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच मानाचा पाचवा गणपती असणारा केसरीवाड्यातला गणपती मुख्य मिरवणूक मार्गानं निघाली. यानंतर तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन झालं. तिसरा मानाचा गणपती गुरुजी तालीम, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन मोठ्या भक्ती भावाने झालं.

तर औरंगाबादमध्ये संस्थान गणपतीची मिरवणूक निघाली गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात. शहरातील प्रतिष्ठीत नागरीक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. 65 वर्षापासूनच्या ऐतिहासिक शेव्हरलेट या गाडीतून ही बाप्पाची मिरवणूक निघाली होती. तर औरंगाबादचे ग्रामदैवत असलेल्या गणेशमुर्तीची मिरवणूक सनई चौघड्याच्या नादासह बैलगाडीतून निघाली. अबालवृद्ध मोठ्या उत्साहानं या मिरवणुकीत सहभागी होऊन मानाच्या गणपतीला निरोप दिला. तिकडे कोकणात चाकरमान्यांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. 'बाप्पा काही चुकल माकलं असेल तर माफ करं' असं म्हणत भक्तांना अश्रु अनावर झाले नाही. विघ्नहर्ता गणेशाच्या या दहा दिवसांची भक्ती मनात घरं करुन भक्तांनी आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला…पण पुढच्या वर्षी लवकरच या असं साकडं ही घातलं…

close