गोवा किल्ला मोजतोय शेवटच्या घटका

October 1, 2012 1:07 PM0 commentsViews: 53

शिवाजी गोरे, दापोली

01 ऑक्टोबर

पर्यटन विकासासाठी गेल्या 37 वर्षांपासून फक्त 1 रुपया वार्षिक भाड्यावर ताब्यात असलेल्या कोकणातल्या ऐतिहासिक गोवा किल्ल्याचा कोणताही विकास पर्यटन महामंडळाने केलेला नसल्याचं सरकारी पाहणीत उघड झालं आहे. एमटीडीसीने किल्ला आणि आसपासची सरकारी जमीन 17 वर्षांपूर्वी विठ्ठल कामत ग्रूपला पर्यटन विकासासाठी दिली होती. पण पर्यटन विकास तर दूरच, किल्ल्याची साधी डागडुजीही झाली नसल्यामुळे ऐतिहासिक असा हा गोवा किल्ला आता शेवटच्या घटका मोजतोय.

रत्नागिरीतल्या हर्णे बंदराजवळ असलेला हा ऐतिहासिक गोवा किल्ला. 1975 सालात केवळ एक रुपया नाममात्र भुईभाड्यावर पर्यटन विभागाकडे सोपवण्यात आला. एमटीडीसीनं 1995 सालात हा किल्ला विठ्ठल कामत ग्रूपच्या ताब्यात दिला. मात्र गेल्या 37 वर्षात कोणताही पर्यटन विकास या ठिकाणी तर झाला नाहीच पण किल्ल्याची साधी डागडुजीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे एमटीडीसीवर शर्तभंग केल्याचा ठपका ठेवत ही संपूर्ण सरकारी जमीन शासनाला परत करावी अशा सूचना महसूल विभागानं एमटीडीसीला केलीय.

दापोलीचे तहसीलदार युवराज बांगर म्हणतात, 1975 पासून आजपर्यंत गेल्या 37 वर्षात त्या ठिकाणी कोणताही पर्यटन विकास झालेला नाही. म्हणून शर्तभंग म्हणून हे प्रकरण आम्ही जिल्हाधिकार्‍यांकडे सोपवलेलं आहे. किल्ल्याची अनेक वेळा पाहणी केली. कोणतीही डागडुजी नाही.. "

एमटीडीसीनं मात्र अद्याप याबाबत कोणतंही उत्तर महसूल विभागाला दिलेलं नाही. तर दुसरीकडे खाजगी जागा असल्याचं कारण देत इथं आलेल्या पर्यटकांनाही किल्ला पाहण्यास मज्जाव केला जात असल्याचं किल्ल्याशेजारीच राहणार्‍या स्थानिकांचं म्हणणं आहे.पर्यटक येतात आणि परत जातात.गेट उघडलं जात नाही. कामत ग्रुप ने रीसॉर्ट बांधलं होतं. मात्र ते तोडफ़ोड करून दुसरीकडे हलवलं. किल्ल्याची पडझड होतेय अशी खंत ग्रामस्थ यशवंत खोपटकर व्यक्त करता.

खाजगीकरणातून पर्यटनाचा विकास हे जरी सरकारी धोरण असलं तरी कित्येक वर्षं विनावापर नाममात्र भाड्यानं मोठ्या उद्योजकांच्या ताब्यात असलेल्या या सरकारी जमिनी एमटीडीसीकडून काढून घेतल्या जात नसल्यामुळे कोकणच्या पर्यटन विकासाला उलटी खीळच बसतेय.

close