संघर्ष जगण्याचा….

December 1, 2008 9:50 AM0 commentsViews: 6

1 डिसेंबर, सोलापूर आसिफ मुर्सलएचआयव्हीची लागण झालेल्या पालकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांची आबाळ होते. अशा मुलांचं बालपण कोमेजून जाऊ नये, म्हणून त्यांना सांभाळण्याचं काम सांगलीमधील ' निवेदिता भगिनी प्रतिष्ठान ' गेली 17 वर्षं करत आहे. ' निवेदिता भगिनी प्रतिष्ठान' मध्ये प्रवेश करताच आई- वडिलांशिवाय राहणारी ही मुलं मनसोक्त बागडताना दिसतात. चार चौघांसारखं आयुष्य ही मुलं जगत आहेत. 1990 मध्ये निवेदिता भगिनी प्रतिष्ठानानं अशा मुलांच्या संगोपनाचं काम सुरू केलं. अगदी सामान्य मुलांच्या घरात वातावरण असतं तसं वातावरण प्रतिष्ठानामध्ये पाहायला मिळतं. गुणवत्तेतही ही मुलं सर्व सामान्य मुलांपेक्षा कुठही कमी नाहीयेत. प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणार्‍या चांगल्या आहारामुळे आणि औषधोपचारामुळे मुलं एड्सग्रस्त आहेत, यावर कुणाचा विश्वासच बसत नाही. ' संस्थेत 51 मुली आहेत. आमच्या संस्थेत काही मुलं आहेत. त्यातली 10 मुलं ही बालवाडीत जातात. आमच्या शाळेतल्या मुली शिक्षण घेत आहेत. शिक्षण खात्याकडून आम्हाला मदत होते. मुलांसाठी वेगळं वसतिगृह उभारण्याचा आमचा मानस आहे. तसं आम्ही लवकरच करू ', अशी माहिती संस्थेच्या शिक्षिका नसीम काझी यांनी दिली.पूर्वी एड्सग्रस्त मुलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा थोडा वेगळा होता. पण आता संस्थेच्या प्रबोधनामुळे मुलांचे इतर नातेवाईक मुलांना घरी घेऊन जायला तयार झालेत. एचआयव्ही म्हणजे आयुष्य संपलं असं होत नाही.. तर त्यासकट आनंदाने जगण्याची एक नवी उमेद देण्याचे प्रयत्न ही संस्था करत आहे.

close