तहसीलदारांवर हल्ल्याचा निषेधार्थ कर्मचार्‍यांचं लेखणी बंद आंदोलन

October 15, 2012 3:33 PM0 commentsViews: 5

15 ऑक्टोबर

जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे नायब तहसीलदार अशोक जगदेव यांच्यावर काल रविवारी वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला. त्याच्या निषेधासाठी महसूल कर्मचार्‍यांनी काळी फीत लावून तर अमळनेरला लेखणी बंद आंदोलन केलं. नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी दिले गेलेले ठेके हे 31 ऑगस्टला संपले तरी नदीपात्रातून वाळू चोरीची माफियागिरी राजरोस सुरु आहे.

महसूल विभागानं उघडलेल्या याच मोहिमेचा फटका हा अशोक जगदेव यांना बसला. जिल्ह्यातील बोरी नदीच्या पात्रातून सुरु असलेला अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी जगदेव काल सकाळी 10 च्या सुमारास या ठिकाणी गेले पण वाळू उपसा करणार्‍या चौघांनी जगदेव यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी घटनास्थळी असलेल्या रिक्षात त्यांना जबरदस्तीनं बसवून रिक्षाचं मशीन पेटवण्याचा प्रयत्न केला. जवळच असलेल्या गावकरी तात्काळ मदतीला धावल्यामुळे जगदेव बचावले. वाळूमाफिया घटनास्थळावरुन पळून गेले. या घटनेची फिर्याद जगदेव यांनी दिल्यानंतर पोलिसांनी अब्बास मिस्त्री या एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा निषेध जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेनं आज केला. इतर तिघांना तातडीनं ताब्यात घ्यावं या मागणीसाठी कर्मचार्‍यांनी आज काळी फीत लावून कामकाज केलं.दरम्यान उपचारासाठी जगदेव यांना अमळनेरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

close