वडरांचा आणखी एक जमीन व्यवहार वादात

October 16, 2012 5:32 PM0 commentsViews: 18

परिक्षीत लुथरा, हरियाणा

16 ऑक्टोबर

रॉबर्ट वडरा यांनी यांचे आणखी काही जमिनींचे व्यवहारही वादात अडकले आहे. वडरा यांनी हरियाणातल्या पलवलमध्ये खरेदी केलेल्या जमीन व्यवहाराचे तपशील आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागले आहे. वडरा यांनी हरियाणातल्या फरीदाबाद जिल्ह्यातल्या पलवलमध्येही जमीन घेतल्याचं उघड झालंय. दिल्ली जवळ असलेली ही जमीन अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. आयबीएन नेटवर्कला मिळालेल्या सेल्स डिलनुसार वडरा यांनी स्वत:च्या नावानं 18 एकर तर त्यांची कंपनी असलेल्या रिअल इस्टेट अर्थ लिमिटेडच्या नावावर 57 एकर अशी एकूण 75 एकर जमीन खरेदी केलीय. याच परिसरात काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनीही 26 लाख रुपयात साडे सहा एकर जमीन खरेदी केली.

वडरांचे वादग्रस्त भूखंड खरेदी- वडरा आणि त्यांच्या कंपनीनं मार्च 2008 ते मे 2009 दरम्यान यमुनेजवळ 75 एकर भूखंड खरेदी केले- एक कोटी 80 लाख रुपयांना भूखंड घेण्यात आले- जमिनीचा दर दीड ते दोन लाख रुपए प्रति एकर असताना ही खरेदी करण्यात आली- विशेष म्हणजे 2009 सालच्या हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर हे दर मोठ्या फरकानं वाढले- आधी त्याचा दर 3 लाख प्रति एकर आणि नंतर 5 लाख प्रति एकर झाला- आणि 2011 पासून इथे दहा लाख रुपए प्रति एकर हा भाव सुरू आहे

दबाव टाकून आणि या भागात होणार्‍या विकास कामांची पूर्वसूचना मिळाल्यामुळेच वडरा यांनी भूखंड खरेदी केल्याचा आरोप विरोधी पक्षाचे नेते करताहेत. आयबीएन नेटवर्कच्या प्रतिनिधींनी हसनापूर गावाला भेट दिली तेव्हा वडरांनी शेतकर्‍यांकडून अत्यल्प किमतीला जमीन खरेदी केल्याची तक्रार गावकर्‍यांनी केली.

वडरा यांनी शेतकर्‍यांची फसवणूक करून अमाप संपत्ती जमवल्याचा आरोप होतोय. 2009मध्ये विधानसभा निवडणूक लढवलेल्या स्थानिक काँग्रेस नेत्याच्या भावाच्या मदतीनं काही भूखंडांचे व्यवहार झाल्याचंही कागदपत्रांवरून उघड झालंय. वडरा यांचे एकापाठोपाठ एक जमीन व्यवहार वादात सापडताहेत आणि त्यामुळे काँग्रेसची अडचण वाढतेय.

close