बाळासाहेबांनी केली गडकरींची पाठराखण

October 19, 2012 9:44 AM0 commentsViews: 9

19 ऑक्टोबर

शेतकर्‍यांची जमीन बळकावल्याच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. केजरीवाल आणि अंजली दमानिया यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं बाळासाहेब ठाकरेंनी सामनामधील अग्रलेखातून म्हटलं आहे.

अण्णा हजारे सुध्दा ऊठसूट कोणतेही कागद घेऊन नुसते आरोप करतात. त्यामुळे माध्यमांमध्ये एखाद् दिवसी बातमी मिळायची पण नंतर आरोप करणारेही गप्प व ज्यांच्यावर आरोप झाले ते मंत्री उजळ माथ्याने फिरु लागले. केजरीवाल हे अण्णांचेच चेले आहेत हे गडकरी प्रकरणावरुन दिसले आहे. केजरीवाल आणि दमानिया यांचे आरोप कमकुवत आहेत ते फक्त एखाद्या नेत्यावर चिखलफेक करून प्रसिद्धी मिळवायची एकमेव हेतू त्यामागे दिसतो. मात्र गडकरींचा खुलासा मान्य करण्यासारखा आहे.

सरकारती जमीन पडीक नसून ती आपल्याला नव्हे तर धर्मादाय संस्थेला भाडेपट्टीवर मिळाली आहे. त्या जमिनीचे मूल्य केवळ 20 लाख रुपये असून ती आपल्या नावावर नाही त्यांचा हा खुलासा मान्य व्हावा असाच आहे. पण या अगोदरही ट्रकभर पुरावे आणण्याची भाषा केली गेली आणि आरोप तर दूरच त्यांचेच हसू झाले. घोटाळे,भ्रष्टाचाराचे आरोप करतानाही जबाबदारीचे भान हवेच. बेजबाबदार आणि बेछूट आरोपांमुळे शेवटी साध्य काहीच होत नाही. फक्त सनसनाटी फारतर काही काळ निर्माण होऊ शकते. मात्र भ्रष्टाचाराचे प्रकरण म्हणजे हवेतला बुडबुडाच ठरतो तो फुटतो आणि त्याच्याबरोबर आरोप करणार्‍यांचीही हवा निघून जाते. नितीन गडकरींनी दिल्लीत जम बसवलाय आणि ते दुसर्‍यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेत, ज्यांना गडकरींचा हा उत्कर्श पाहवत नाही त्यांनीच संगनमत करुन असे आरोप केले आहे त्या पडीक जमिनी प्रमाणे त्यांच्यावरील आरोपही 'वांझ' आहे असं स्पष्टीकरण बाळासाहेब ठाकरेंनी केलं.

close