बीडचं कुटुंब एचआयव्हीशी नव्हे तर समाजाशी लढतंय…

December 1, 2008 1:24 PM0 commentsViews: 3

1 डिसेंबर, नाशिक दीप्ती राऊत एचआयव्हीची लागण झालेल्या एका कुटुंबांला गावानंच वाळीत टाकलंय. बीडपासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावरच्या धारूरमध्ये खुद्द आरोग्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात हे घडतंय.संजय ( नाव बदललं आहे) घर गावात नसल्यासारखंच. संजय आणि त्याची पत्नी स्वाती, मुलगा दीपक. तिघंही एचआयव्ही पॉझीटीव्ह.' मी दोन वर्ष घराच्या बाहेर निघत नव्हतो. सख्या भावानं त्रास दिला. आईनं दिला. वडिलांनी दिला. गावकर्‍यांनी दिला. शेवटी सरपंचांनी दिला ', असं संजय सांगत होते. संजय आणि त्यांच्या कुटुंबांचा औषधाचा खर्च तीन वर्षांत दीड लाखांच्या घरात गेला. शेवटी त्यांनी दारूचा धंदा सुरू केला.काही वर्षांपूर्वी कुष्टरोग्यांना गावाबाहेर काढलं गेलं. पोटासाठी त्यांना गावाबाहेर दारुच्या भट्‌ट्या पेटवाव्या लागल्या. त्यांच्या खुरड्या हाताची दारू मात्र सर्वांना चालली. तेच चक्र आज पुन्हा फिरतंय. ते एचआयव्हीबाबत. संजय यांचा मुलगा दीपकच्या वाट्याला हेच आलंय. एचआयव्ही असल्याबद्दल वहीवरचा शेरा आणि हातात देशी दारूची बाटली. ' सातवीला गेलो तर डेस्कवर पांढरं केलेल लिवलं होतं, एचआयव्ही आहे. त्याच्याजवळ कोणी बसू नये. हापशावर गेलो. पाणी प्यायचं नाही. आम्हाला रोग होईल. गुरुजी म्हणाले बाटली आण. बाटली आणली तर म्हणे एड्स आला बाटली घेवून ' असं लहानगा दीपक सांगत होता. दीपकच्या शिक्षकांनी पहिल्यांदा याचा इन्कार केला आणि चौकशी चालू असल्याचं शाळेचं व्यवस्थापन म्हणतंय.' विद्यार्थी, इतर मुलं, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचं म्हणणं ऐकून मी संस्थेपुढे मांडेन ', असं सचिव एस. ए. अदमाने म्हणाले. या सगळ्यात त्या मुलाच्या मनाचं काय ? या प्रश्नाचं उत्तर कुणाजवळही नाही. ' माझ्यासोबत पोरं खेळतात. त्यांना बोलतात याच्या संग बसत जावू नका. त्याला बोलत जावू नका. त्याचं पुस्तक घेवू नका. आपल्यालाही रोग होईल.जेवताना माझ्या तीन पट्‌ट्या लांब बसतात. एचआयव्ही रोग असंल. मग मला कशाला चिडवतात…? ', असं दीपक सांगत होता. दीपकच्या या प्रश्नाचं उत्तर देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

close