प्रकल्प तुपाशी, शेतकरी उपाशी !

October 22, 2012 5:14 PM0 commentsViews: 42

आशिष जाधव, मुंबई

22 ऑक्टोबर

शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या होणारा भाग अशी विदर्भाची ओळख… या आत्महत्या रोखण्यासाठी विदर्भात मोठ्या प्रमाणावर धरणांचे प्रकल्प मंजूर झाले. पण या धरणातल्या पाण्यातून शेतकर्‍यांचं भलं होण्याऐवजी औष्णिक वीज प्रकल्पांचं भलं होतंय. या भागात तब्बल 89 औष्णिक वीज प्रकल्प येऊ घातले आहे. त्यातल्या अनेक प्रकल्पांना सिंचनाचं पाणी मंजूर करण्यात आलंय. त्यामुळे 5 लाख हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित राहणार आहे.

राज्यातलं सर्वाधिक पाणी विदर्भात गोदावरीच्या 19 उपखोर्‍यांमध्ये आहे. पण नद्यांवर धरणं बांधली गेली नाहीत कालवे काढले गेले नाहीत. त्यामुळे विदर्भात राज्यातला निम्मा म्हणजे सुमारे 11 लाख 58 हजार हेक्टर्सचा सिंचन अनुशेष आहे. असं असतानाही नदी-धरणांमधलं पाणी शेतीला देण्याऐवजी औष्णिक वीज प्रकल्पांना दिलं जातंय.

विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या आकडेवारीनुसार, विदर्भात थोडे थोडके नाही तर तब्बल 89 औष्णिक वीज प्रकल्प येऊ घातले आहेत. त्यातल्या 33 प्रकल्पांना राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. एवढंच नाही तर 30 वीज प्रकल्पांना जलसंपदा खात्यानं धरण आणि नदीतलं 902 दशलक्ष घन मीटर पाणी मंजूरसुद्धा केलंय. आणखी 10 वीज प्रकल्पांनी केलेली 240 दशलक्ष घन मीटर पाण्याची मागणी सरकार दरबारी प्रलंबित आहे. त्यामुळंच विदर्भवादी नेत्यांमध्ये रोष उफाळून आला आहे.

विदर्भात सध्या तीन खाजगी औष्णिक वीज प्रकल्पांच्या उभारणीचं काम सुरू आहे. त्यातला नागपूर जिल्ह्यातला 540 मेगावॅटचा आयडियल औष्णिक वीज प्रकल्प तर वडगाव जलाशयाच्या लाभक्षेत्रात आणि पूर्ती साखर कारखान्याला लागून उभा राहिलाय. आयडियलचा 270 मेगावॅटचा पहिला संच काही महिन्यांमध्ये कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पाला जलसंपदा खात्यानं लोअर वेणा धरणाचं 17.8 दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर केलंय. दुसरा 1340 मेगावॅटचा वीज प्रकल्प हा लॅन्को कंपनीचा आहे, तो वर्धा जिल्हयात उभारला जातोय. त्याला लोअर वर्धा धरणाचं 46 दशलक्ष घन मीटर पाणी मंजूर करण्यात आलंय. तर अमरावती जिल्ह्यात होत असलेल्या 2640 मेगावॅटच्या इंडियाबुल्स-सोफिया वीज प्रकल्पाला अप्पर वर्धा धरणाचं 87.60 दशलक्ष घनमीटर पाणी वळवण्यात आलंय.

औष्णिक वीज प्रकल्पांसाठी मोठ्या संख्येनं जमिनीचे सौदे सुरू आहेत. त्यांना सिंचनाचं पाणी दिलं जातंय, तरीसुद्धा जलसंपदा मंत्री मात्र वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहे.

प्रस्तावित 89 औष्णिक वीज प्रकल्प उभारले गेले तर त्यांना सिंचनाचं समारे 1 हजार 942 दशलक्ष घन मीटर पाणी वळतं होणार आहे. तर 4 लाख 82 हजार हेक्टर जमीन ओलितापासून वंचित राहणार आहे. ज्या भागात सिंचनाअभावी शेतकर्‍यांच्या आत्महत्या होतायत, त्या भागासाठी ही खरोखरंच शोकांतिका म्हणावी लागेल.

close