वीज प्रकल्पासाठी पाण्याचा पाट, शेतकर्‍यांना घरची वाट !

October 22, 2012 5:30 PM0 commentsViews: 39

22 ऑक्टोबर

अमरावती शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर इंडियाबुल्स-सोफियाचा औष्णिक वीज प्रकल्प उभा राहतोय. या प्रकल्पाला अप्पर वर्धा धरणातलं पाणी विकण्यात आलंय. त्याविरोधात इथले शेतकरी तीव्र आंदोलन करत आहे.

अप्पर वर्धा धरण… विदर्भातलं तयार झालेलं पहिलं मोठं धरण. पण कालवे काढून शेतात पाट वाहण्याची वेळ आली तेव्हा मात्र या धरणातलं पाणी इतरत्र पळवण्याचे निर्णय झाले. या धरणाचं 87.60 दशलक्ष घनमीटर पाणी अमरावती जिल्ह्यातल्या इंडियाबुल्स-सोफीया औष्णिक वीज प्रकल्पाला दिलं गेलंय. त्याला सर्वच स्तरावरून तीव्र विरोध होतोय.

इंडियाबुल्स-सोफियाचा प्रकल्प हा विदर्भातला सर्वात मोठा औष्णिक वीज प्रकल्प असणार आहे. सुमारे 1200 हेक्टर जमिनीवर 2 हजार 640 मेगावॅटचा हा महाकाय प्रकल्प उभारला जातोय. या प्रकल्पासाठी अप्पर वर्धाचं 87.60 दशलक्ष घनमीटर पाणी जलसंपदा खात्यानं 232 कोटी 18 लाख रुपयांना विकलं. तसा करार जलसंपदा खात्यानं केला. सरकारचा हा निर्णय शेतकर्‍यांच्या जिवावर बेतणार असल्याचा आरोप होतोय.

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पॅकेजमधून अप्पर वर्धा प्रकल्पाच्या कामाला निधी दिला गेला. त्यावेळी या धरणाच्या पाण्यातून 75 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येईल, असं जलसंपदा खात्यानं जाहीर केलं. पण इंडियाबुल्स-सोफिया प्रकल्पाला धरणातलं पाणी वळतं झाल्यामुळं अमरावती विभागतली 23 हजार 219 हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित राहणार आहे.

गेल्या 4 ऑक्टोबरला मुंबई हायकोर्टानं इंडियाबुल्स-सोफिया प्रकल्पाला 2012-13 या वर्षासाठी पाणी देण्याचा अंतरिम आदेश दिलाय. पण आंदोलक कोर्टाची लढाई शेवटपर्यंत लढण्याच्या तयारीत आहेत.

इंडियाबुल्स-सोफिया प्रकल्प- इंडियाबुल्स-सोफियाचा प्रकल्प विदर्भातला सर्वात मोठा औष्णिक वीज प्रकल्प- 1200 हेक्टर जमिनीवर 2640 मेगावॅटचा प्रकल्प – प्रकल्पासाठी अप्पर वर्धाचं 87.60 द.ल.घ.मी. पाणी मंजूर- जलसंपदा खात्यानं 232.18 कोटींना विकलं पाणी- सरकारचा हा निर्णय शेतकर्‍यांच्या जिवावर बेतणार असल्याचा आरोप

close