दहशतवादी हल्ल्याच्या कटामागे आयएसआयचा हात

December 2, 2008 7:19 AM0 commentsViews: 6

2 डिसेंबर, मुंबई तोरल वारियामुंबई हल्ल्याबाबत सुरू असलेल्या चौकशीबाबत महाराष्ट्राच्या पोलिसांनी अमेरिकेच्या एफबीआयबरोबर चर्चा केली. एफबीआयच्या पथकानं काल सकाळी हल्ल्याच्या ठिकाणांची पाहणी केली. दरम्यान, या हल्ल्याचा संपूर्ण कट आयएसआयच्या माजी प्रमुखानं रचल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सारं जग हादरलं. या हल्ल्यामुळे अमेरिकेतल्या 9/11 चा तपास करणार्‍या पथकांची जिज्ञासा जागी झाली. अमेरिकेच्या एफबीआयच्या सात सदस्यांच्या पथकानं हल्ल्याच्या सर्व ठिकाणांची पाहणी केली. राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचीही भेट घेतली. हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याच्या पुराव्यांविषयी भारतानं अमेरिकेशी पहिल्यांदाच माहितीची देवाणघेवाण केली. मोहम्मद अजमल कसाबनं दिलेली माहिती मुंबई पोलिसांनी एफबीआयला दिली. जप्त झालेल्या पाकिस्तानी बनावटीच्या शस्त्रांचा तपशील, अतिरेकी आणि लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद मुझमील यांच्यातले फोन कॉल, कराचीहून येण्यासाठी अतिरेक्यांनी वापरलेल्या अल हुसैनी या जहाजाची माहिती आणि लाहोरशी संबंध दाखवणार्‍या अतिरेक्यांच्या ई-मेलविषी माहिती दिली. अतिरेक्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मदतीनंच कराची सोडल्याचं तपास पथकांनी सांगितलंय आणि हल्ल्याचा संपूर्ण कट आयएसआयचा माजी प्रमुख नदीम ताज यानं रचला होता.पकडलेला अतिरेकी अजमल कसाबला झकीर-उर-रहमान या व्यक्तीनं फिदायीन म्हणून भरती केलं होतं. त्यासाठी अजमलच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये देण्यात आले होते, असं अहवालात म्हटलंय.अजमल हा अतिशय गरीब कुटुंबातून आलाय. कोटली, उम्म-अल-कारा आणि फिदायीनसाठी खास असलेल्या पॉईंट कॅम्पमधून ट्रेनिंग घेतल्याची कबुली अजमलनं दिलीय. लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद मुझमिल हा स्वत: या ट्रेनिंगमध्ये सहभागी होता, असं समजतंय. अजमलनं पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांची नावंही सांगितलीयत. आता पाकिस्तानकडून संपू्र्‌ण सहकार्य मिळण्याची गरज आहे, अशा टप्प्यापर्यंत पोचलो असल्याचं तपास पथकांनी सांगितलंय.

close