‘पाकसोबत क्रिकेट खेळणं म्हणजे शहिदांचा अपमान’

November 1, 2012 11:20 AM0 commentsViews: 13

01 नोव्हेंबर

पाकिस्तानी क्रिकेट टीमवर शिवसेनेनं पुन्हा एकदा आसुड ओढला. देशात अतिरेकी कारवाई करून त्यांनी रक्तमांसाचे सडे पाडले आहेत देशाला नामशेष करण्यासाठी दहशतवादाचे जाळे टाकले आहे त्यामुळे देशाचे अस्तित्व डळमळीत झाले आहे. असे असतांना सुद्धा पाक सोबत क्रिकेट सामन्यांना परवानगी देऊन क्रिकेट बोर्ड नमकहरामी करत आहे यात आपले क्रिकेट खेळाडूपण सहभागी होतं आहेत. पाकसोबत खेळणं म्हणजे शहीद जवानांचा अपमान आहे अशी घणाघाती टीका बाळासाहेबांनी केली आहे. आज गुरुवारच्या सामनाच्या अग्रलेखात बाळासाहेबांनी केंद्रीय गृहमंत्रालयावर या सामन्यांना परवानगी दिल्याप्रकरणी टीकेची झोड उडवलीय.

केंद्रीय गृहमंत्रालयाने दोनच दिवसांपुर्वी पाकिस्तान – भारत क्रिकेट सामन्याला हिरवा कंदील दिला. शिवसेनेनं या अगोदरच या सामन्याला कडाडून विरोध केला होता. पाक टीमला मुंबईत काय महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असा इशारा शिवसेनेनं दिला होता. मात्र क्रिकेट बोर्डाने महाराष्ट्र वगळून इतर राज्यात सीरिजला परवानगी दिली. मात्र क्रिकेट बोर्ड आणि गृहमंत्रालयाच्या कारभारावर बाळासाहेब ठाकरेंनी आसुड ओढला. मनमोहन सरकार देशाचे शत्रू बनले आहे त्यामुळेच त्यांनी क्रिकेट सामान्यांना परवानगी दिली. महाराष्ट्रला वगळून त्यांनी दिल्ली, चेन्नई,कोलकाता,बंगळूर येथे हे सामने भरवले जाणार आहे पण दिल्लीत अतिरेक्यांनी कितीवेळा हैदोस घातला हे विसरता कामा नये. देशाच्या लोकशाहीचं प्रतिक असलेल्या संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला केला त्याच्या जखमा कधीच भरून येणार्‍या नाही.

आमच्या जवानांच्या सांडेलेल्या रक्तास, हौतात्म्यास काही किंमत आहे की नाही ? 26/11 नंतर पाकसोबत क्रिकेट सामने थांबले पण आपले खेळाडू मात्र देशाबाहेर त्यांच्याशी खेळत होते. एक सुनील गावस्कर आणि कपिल देव सोडले तर कोणी तरी असं म्हटलं नाही पाक सोबत खेळू नका. पण पाक,बांग्लादेशसोबत खेळून क्रिकेट बोर्ड नमकहरामी करत आहे व त्यात आपले क्रिकेटपटूही सहभागी होतं आहे. विजयानंतर क्रिकेटच्या मैदानात देशाचा तिंरगा फडकवणे हा वेगळा भाग. पण तिरंगा ज्यांच्यामुळे संकटात सापडला त्यांच्याशी खेळणे म्हणजे शहीदांचा अपमान आहे.

पैसा मिळतोय म्हणून तिरंगा फडकवणारे भाडोत्री खूप मिळतील पण देशाच्या सीमेवर शहीद झालेल्या जवानाच्या शवपेटीवर गुंडाळलेला तिरंगा जास्त तेजस्वी आहे. तेथे फक्त त्याग आणि बलिदान आहे इतरत्र फक्त पैसा आणि राजकीय मतलब आहे अशी टीका सामना दैनिकातून करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्रालयाचा बाळासाहेबांनी समाचार घेतला. महाराष्ट्राचे असलेले सुशीलकुमार शिंदे यांनी असा निर्णय घेऊन जनतेकडून कपाळ बडवून घेत आहे अशी तिखट टीका बाळासाहेबांनी केली.

close