शिवडी-न्हावाशेवा ‘सी लिंक’ला मंजुरी

October 30, 2012 5:06 PM0 commentsViews: 25

30 ऑक्टोबर

गेली अनेक वर्षे रखडलेल्या शिवडी-न्हावाशेवा सीलिंक प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. मुंबई आणि नवीमुंबईला जोडणार्‍या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्रीय वित्त मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. तब्बल 9 हजार 600 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार 1 हजार 920 कोटी रुपये देणार आहे.

या प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयानं सीआरझेडची परवानगी या आधीच दिलीय. त्यामुळे आता हा प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी सी लिंकसाठी जमिनीवरुन सिडको आणि एमएमआरडीएमध्ये वाद झाला होता. या प्रकल्पाची एक बाजू न्हावाशेवा येथे समाप्त होणार आहे. त्यानंतर हा खाडीपूल नवी मुंबईतील मुख्य रस्त्याला जोडला जाणार आहे.

1995 पासून या प्रकल्पासाठी प्रक्रिया सुरु झाली होती. सुरुवातीला एमएसआरडीसीने याचे टेंडर भरले आणि नंतर हे काम रिलायन्सला देण्यात आले.मात्र काही कारणामुळे ते रद्द झाले आणि हे काम एमएमआरडीएकडे सोपवण्यात आलं. या सी लिंकचा बहुतांशी मार्ग समुद्रातून जात असून 12 कि.मी.चा रस्ता केवळ जमिनीवरचा आहे. त्यासाठी रायगडमधील शेतकर्‍यांची 28 हेक्टर जमीन घेण्यात येणार आहे. तर सिडकोची 83 एकर जमीन उपलब्ध झालीय. यापुढच्या टप्प्यात शिवडी ते वरळी हा मार्ग करण्याची शक्यता आहे. हा मार्ग झाल्यानंतर न्हावाशेवा-शिवडी-वरळी पुढे तो सी लिंकला जोडला जाणार आहे.

close