भाजपची गडकरींना क्लीन चीट

November 6, 2012 4:47 PM0 commentsViews: 14

06 नोव्हेंबर

नितीन गडकरींवर केलेले आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहे. भाजप गडकरींच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. त्यांच्या पुर्ती ग्रुपमध्ये असलेल्या बेनामी कंपन्यांचा काहीही संबंध नाही असा खुलासा भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी केला. तसेच कार्यकर्त्यांनी आरोपांकडे दुर्लक्ष करावं आणि यावर कोणतीही चर्चा करू नये असं आवाहनही त्यांनी केलं. आज संध्याकाळी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात कोअर कमिटीची बैठक पार पडली. सुषमा स्वराज, राजनाथ सिंह, अरूण जेटली या बैठकीत उपस्थित होते. पण, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि गडकरी मात्र गैरहजर होते. तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत गडकरींच्या अध्यक्षपदाच्या भवितव्यावर मॅरेथान चर्चा झाली आणि अखेरीस पुन्हा एकदा भाजपने गडकरींच्या नेतृत्वाचा विश्वास ठेवत आरोप फेटाळून लावले.

पूर्ती ग्रुपमध्ये 19 बेनामी कंपन्याचे शेअर असल्याचं उघड झाल्यामुळे नितीन गडकरी चांगलेच अडचणीत सापडले. मात्र संघाने गडकरींच्या सगळ्या चुकामाफ करून अध्यक्षपद वाचवले. संघाच्या पाठिंब्यामुळे भाजपलाही नमतं घ्यावं लागलं आणि गडकरींच्या पाठीशी उभं राहवं लागलं. पण भाजपच्या अंतर्गत धुसफूस सुरुच होती. सोमवारी पक्षाचे नेते महेश जेठमलानी यांनी बंडाचा झेंडा फडकावला आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या गडकरींसोबत काम करणं शक्य नाही असं सांगत महेश जेठमलानींनी राजीनामा दिला. आणि आज सकाळी गडकरींनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी थेट मागणी खासदार राम जेठमलानी यांनी केली. आपल्या मागणीला पक्षातल्या काही ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला यावर तोडगा म्हणून भाजपच्या कोअर कमिटीने तातडीने आज दिल्ली बैठक बोलावली. या बैठकीत एस.गुरूमुर्ती यांनी पुर्ती ग्रुपमध्ये कोणताही घोटाळा नाही याचा लेखाजोखा मांडला. यानंतर भाजपच्या नेत्यांनी गडकरींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असं स्पष्ट केलं.

close