चीनमध्ये सत्ताबदलासाठी 18 व्या अधिवेशनाला सुरुवात

November 8, 2012 5:26 PM0 commentsViews: 4

08 नोव्हेंबर

चीनमधल्या ऐतिहासिक सत्ताबदलासाठी कम्युनिस्ट पक्षाच्या 18 व्या राष्ट्रीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनासाठी कम्युनिस्ट पक्षाचे 2 हजार 270 प्रतिनिधी बिजिंगमध्ये आले आहे. अधिवेशनाचं उद्घाटन करताना राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांनी 10 वर्षांतल्या कार्यकाळाचा 41 पानी अहवाल मांडला. कम्युनिस्ट पक्षातला वाढत्या भ्रष्टाचार, सामाजिक असंतोष आणि पर्यावरणाचा र्‍हास हे मुद्दे त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केले. भ्रष्टाचाराबद्दल लोकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं त्यांनी कबूल केलं. सरकारविरोधात वाढत्या सामाजिक असंतोषाचा सामना करण्यासाठी पक्षानं सज्ज राहायला हवं असा इशारा त्यांनी दिला. चीनमध्ये राजकीय सुधारणा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. पण पाश्चिमात्य देशांचं अनुकरण न करण्याचा निर्धार व्यक्त केला. लष्कराचं आधुनिकीकरण करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. हे अधिवेशन आठवडाभर चालणार आहे. याच अधिवेशनात हू जिंताओ राष्ट्राध्यक्षपद शी जिनपिंग यांच्याकडे सोपवतील. तसंच चीनमधली सर्वोच्च समजली जाणार नवी स्थायी समितीही अस्तित्वात येईल.शी जिनपिंग चीनचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. कोण आहेत जिनपिंग आणि त्यांच्यासमोर कोणती आव्हानं आहेत

कोण आहेत जिनपिंग ?- जिनपिंग हे 1974 पासून कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य- सामान्य कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात- शिक्षण : केमिकल इंजिनिअरिंग – काहीसे उदारमतवादी अशी ओळख- मध्यंतरी 2 आठवडे बेपत्ता असल्यानं चर्चेला उधाण

आव्हानं काय असतील ?- आर्थिक सुधारणांचा वेग कायम राखणे- पोलादी पकड कायम ठेवून राजकीय सुधारणा करणे- चीनची आक्रमक प्रतिमा बदलण्यासाठी प्रयत्न- मानवाधिकार रक्षणासाठी असलेला जागतिक दबाव कमी करणे

close