मुख्यमंत्री समर्थकांची दिल्लीत मोर्चेबांधणी

December 2, 2008 3:32 PM0 commentsViews: 8

2 डिसेंबर, मुंबईमुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपली खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी आपले समर्थक मंत्री आणि आमदार दिल्लीला पाठवलेत. यात संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील प्रमुख भूमिका बजावत आहेत. हर्षवर्धन पाटील हेही स्वत:ला दहा अपक्ष आमदारांचे नेते म्हणवून घेतायत. अपक्ष आमदार देशमुख वगळता अन्य कुणालाही पाठिंबा देणार नाहीत, असा त्यांचा दावा आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हेही विलासरावांचीच बाजू हायकमांडकडे मांडत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आणि संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांची भेट माणिकराव ठाकरेंनी घेतलीय. विलासरावांच्या नावाशिवाय पर्याय नाही, असं त्यांनी अँटनींनी सांगितल्याचं कळतंय. याशिवाय सोनियांचं राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचीही देशमुखांनी मदत घेतलीय. मुख्यमंत्रीपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिलाय. दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांनी हे पद घेण्याची तयारी दाखवलीय. पण तरीही मुख्यमंत्री मराठाच असला पाहिजे, अशी देशमुख समर्थकांची मागणी आहे. खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची दिल्लीत जोरदार मोर्चेबांधणी सुरू असताना काँग्रेस- राष्ट्रवादीची बैठक आज झाली नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत उपमुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेणार नाही, असं राष्ट्रवादीनं सांगितलंय. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय उद्यावर गेलाय.

close