ऊसदराच्या आंदोलनाला हिंसक वळण; दोन ठार

November 12, 2012 9:58 AM0 commentsViews: 37

12 नोव्हेंबर

ऐन दिवाळीत ऊसदराचं आंदोलन पेटलंय. उसाला 3000 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी राजू शेट्टींनी आंदोलन पुकारल्यानंतर काल रात्री त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर हे या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून इंदापूरजवळ लोणी देवकर इथं स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी एसटीची बस पेटवली. या आंदोलनात आतापर्यंत दोन शेतकर्‍यांचा बळी गेला आहे. सांगली जिल्ह्यात वसगडे इथं आंदोलकांनी पोलिसांची बाईक जाळल्यांतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चंद्रकांत नलावडे या शेतकर्‍याचा मृत्यू झाला आहे. तर इंदापूरपमध्ये ट्रकची हवा काढत असताना ट्रकची धडक लागून पुंडलिक कोकाटे या आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर इंदापूरमध्ये प्रचंड तणाव निर्माण झालाय. इथं कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

तर आंदोलनाचं लोण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पसरलंय. वाठारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. कार्यकर्त्यांनी 4 ते 5 पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली.बार्शी-माढा रोडवरच्या शेंद्री गावाजवळ एसटी महामंडळाच्या बसेस फोडण्यात आल्या आहे. आंदोलनकांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत 6 पोलीस जखमी झाले आहे.

तर सांगलीत आंदोलकांनी रास्ता रोको केला, काही बसेसची तोडफोड केली आहे. अनेक गाड्यांची हवा काढण्यात आली. तसेच बारामतीजवळ पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. इथं काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर कोल्हापूरमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर पोलिसांना लाठीमार करावा लागला. दरम्यान, ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आल्यानं दिवाळीसाठी निघालेले शेकडो लोक रस्त्यातच खोळंबले आहेत.

close