हिवाळी अधिवेशनात गाजणार FDI चा मुद्दा

November 20, 2012 5:31 PM0 commentsViews: 12

20 नोव्हेंबर

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आता फक्त एक दिवस उरलाय आणि अधिवेशनासाठी सरकार आणि विरोधकांनी जय्यत तयारी सुरू केलीय. थेट परकीय गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी यांनी अविश्वासदर्शक ठराव मांडण्याची तयारी दाखवली आहे. इतर पक्षांकडून त्याला फारसा पाठिंबा सध्या मिळालेला नसला तरी कुणीही आपली भूमिका अजून पूर्णपणे स्पष्ट केलेली नाही. भाजप आणि एनडीएनं मात्र या मुद्द्यावरून आपण संसदेत मतदानाचा ठराव मांडू, असं म्हटलंय.

संसदेचं हिवाळी अधिवेशन 22 नोव्हेंबरला सुरू होतंय. अधिवेशनात थेट परकीय गुंतवणुकीचा मुद्दा गाजणार हे नक्की. त्याचीच तयारी म्हणून काँग्रेसनं वेगवेगळ्या पक्ष नेत्यांच्या बैठका घेणं सुरू केलंय. अधिवेशनाच्याच पार्श्वभूमीवर एनडीएच्या नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. एफडीआयच्या मुद्यावर संसदेत चर्चा करून मतदान घ्यावं, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तर सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणता येईल का? याची चाचपणीही एनडीए करणार आहे.

सध्या लोकसभेत यूपीएचे 254 खासदार आहेत. यात काँग्रेसचे 206, द्रमुकचे 18, राष्ट्रवादीचे 9 खासदार आहेत. शिवाय या सरकारला समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि इतर असे एकूण 50 खासदारांचा पाठिंबा आहे.

दुसरीकडे एनडीएकडे 152 खासदार आणि तृणमूल आणि डाव्यांचे मिळून 88 खासदार आहेत. ममता बॅनर्जी यांनी तर डाव्यांनी अविश्वादर्शक प्रस्ताव मांडला तर त्याला समर्थक देऊ, असं म्हटलंय.

सीपीएम, सीपीआयनं जरी अविश्वासदर्शक ठराव आणला, तर आम्ही समर्थन करू अशी भुमिका ममता बॅनर्जी यांनी घेतली. तरअविश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा द्यायचा की नाही, हा मुद्दा नाही. तर सरकारनं जनतेविरोधी जी आर्थिक धोरणं आखली आहेत ती रद्द करावी, हा मुख्य मुद्दा आहे असं सीपीएम नेते सीताराम येचुरी यांनी म्हटलंय. परकीय गुंतवणुकीच्या मुद्द्यावर मतदान घेण्याच्या मागणीला लोकसभा अध्यक्ष नकार देतील, अशी सरकारला आशा आहे. पण जयललितांच्या अण्णाद्रमुकसारख्या काही पक्षांनी अजून भूमिका स्पष्ट केलेले नाही.

थेट परकीय गुंतवणुकीला अनेक पक्षांचा विरोध आहे आणि यातल्या अनेकांनी अविश्वासदर्शक ठरावाबाबत सगळे पर्याय खुले ठेवलेत. तिकडे संख्याबळाच्या जोरावर ठराव जिंकू, असा विश्वास काँग्रेसला आहे. पण अनेकांचा विरोध असताना परकीय गुंतवणुकीचा निर्णय लोकांवर थोपवण्यात आला, असा संदेश यातून जाईल, याची काँग्रेसला चिंता लागून आहे.

close