कसाबला फासावर लटकावले

November 21, 2012 9:51 AM0 commentsViews: 236

21 नोव्हेंबर

मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबला आज सकाळी 7.30 वाजता पुण्यातल्या येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली. येरवडा तुरुंगातच त्याला दफनही करण्यात आलं. मुंबईवर हल्ला करून देशाविरुद्ध युद्ध पुकारल्या प्रकरणी त्याला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यानं राष्ट्रपतींकडं दयेचा अर्ज केला होता. पण राष्ट्रपतींनी 5 नोव्हेंबरला कसाबच्या दयेचा अर्ज फेटाळला. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्याच्या फाशीच्या अंमलबजावणीचं पत्र तुरुंग अधिक्षकांना लिहिलं. 8 नोव्हेंबर रोजी भारतानं पाकिस्तानला कसाबच्या फाशीबद्दल कळवलं. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कसाबला मुंबईतून पुण्यातील येरवाडा जेलमध्ये नेण्यात आलं. आणि आज सकाळी येरवाडा तुरुंगात कसाबला फाशी देण्यात आली. कसाबच्या फाशीच्या ऑपरेशनला 'ऑपरेशन एक्स' असं नाव देण्यात आलं होतं. हे सगळं ऑपरेशन अत्यंत गोपनीय ठेवण्यात आलं होतं. कसाबला फाशी दिल्यानंतरच सरकारनं 'ऑपरेशन एक्स' यशस्वी झाल्याचं जाहीर केलं. दरम्यान, फाशीच्या शिक्षेआधी कसाबनं कोणतीही अखेरची इच्छा व्यक्त केली नव्हती. कसाबल्या दिल्या गेलेल्या फाशीमुळे 26/11 च्या हल्ल्याप्रकरणी अखेर न्याय झाल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जातेय.

1995 नंतर दिलेली पहिलीच फाशी

आज कसाबला दिलेली फाशी ही राज्यात 1995 नंतर दिलेली पहिलीच फाशी आहे. कसाबला फाशी देण्यासाठी अनेकजण इच्छूक होते. त्यातून एकाची निवड करण्यात आली. सरकारनं कसाबला फाशी देणार्‍या जल्लादाला 5000 रुपये मोबदला दिला. आधी तो 10 रुपये होता. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही माहिती दिली. तसंच तपासात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या पोलीस अधिकार्‍यांचाही गौरव केला जाणार आहे.

कसाबला फाशी देण्यासाठी ऑपेरशन X राबवण्यात आलं होतं.नेमकं काय आहे ऑपरेशन 'X' ?10 अधिकार्‍यांवर जबाबदारीऑपरेशनचं नेतृत्व डीजी संजीव दयाळ यांच्याकडेसमन्वयाची जबाबदारी आयजी देवेन भारतींवरकसाबच्या सुरक्षेची हिमांशू राय यांच्यावरसदानंद दाते यांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी

आज नेमकं काय घडलं ?

भारतावर सर्वात मोठा अतिरेकी हल्ला करणारा दहशतवादी अजमल आमीर कसाब याला अखेर फाशी झाली. फासावर नेताना त्याला अतिशय पश्चाताप होत होता, असं तुरुंग अधिकार्‍यांना सांगितलंय.

- आपल्या कृत्याचा अतिशय पश्चाताप होत असलेल्या कसाबचे अखेरचे शब्द होते अल्लाह कसम..ऐसी गलती दुबारा नहीं होगी..अल्लाह मुझे माफ करें… कसाबनं कुठलीही शेवटची इच्छाही व्यक्त केली नाही. – 21 नोव्हेंबर हा फाशीचा दिवस निश्चित करण्यात आल्याचं कसाबला 12 नोव्हेंबरलाच सांगण्यात आलं होतं – ही माहिती पाकिस्तानात राहत असलेली आपली आई नूरीलाई हिला द्यावी, अशी विनंती कसाबनं केली – त्यावर तत्काळ कारवाई करत भारत सरकारनं कुरिअर करून कराचीतल्या त्याच्या घरी ही माहिती कळवली – पाकिस्तान सरकारलाही माहिती देण्यात आली. पण पाकिस्तानकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. पाकिस्तानच्या भारतातल्या उच्चायुक्तांना 20 नोव्हेंबरला ही माहिती देण्यात आली – तसंच इस्लामाबादमधल्या भारतीय उच्चायुक्तांनी पाकिस्तानच्या सरकारलाही माहिती दिली. पण ते पत्रक स्विकारायलाही पाकिस्तान सरकारनं नकार दिल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशिल कुमार शिंदे यांनी सांगितलंय. दरम्यान, कसाबच्या मृतदेहाचीही मागणी पाकिस्तानकडून करण्यात आलेली नाही

अजमल आमिर कसाब याला पाच गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून फाशी देण्यात आली.

गुन्हा क्र. 1भारताविरोधात युद्ध पुकारणं(शिक्षा-फाशी)

गुन्हा क्र. 2बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत अतिरेकी कारवाईप्रकरणी दोषी (शिक्षा-फाशी)

गुन्हा क्र. 3हल्ल्याचा कट आखणे (शिक्षा-फाशी)

गुन्हा क्र. 4पोलीस अधिकारी अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे, तुकारम ओंबाळे, अमरसिंह सोळंकींसह 7 जणांची हत्या करणे(शिक्षा-फाशी)

गुन्हा क्र. 5159 जणांच्या हत्येसाठी चिथावणी देणे (शिक्षा-फाशी)

खटल्याचा घटनाक्रम…

26 नोव्हें. 2008 – कसाब आणि इतर 9 अतिरेक्यांचा मुंबईवर हल्ला27 नोव्हें. 2008 – अजमल कसाब सापडला6 मे 2009 – आरोपपत्र दाखल23 जून 2009 – हाफीज सईद, झकी-उर-रहमान लख्वीसह 22 जणांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट 3 मे 2010 – विशेष कोर्टात कसाब दोषी, सबाऊद्दीन आ णि फहीम अन्सारी निर्दोष6 मे 2010 – विशेष कोर्टानं कसाबला फाशीची शिक्षा सुनावली18 ऑक्टो. 2010 – मुंबई हायकोर्टात खटला सुरू, कसाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर21 फेब्रु. 2011 – कसाबच्या फाशीची शिक्षा हायकोर्टात कायम, सबाऊद्दीन आणि फहीम अन्सारी निर्दोष29 ऑगस्ट 2012 – कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर सुप्रीम कोर्टाकडून शिक्कामोर्तब झालं.

5 नोव्हेंबर 2012 – राष्ट्रपतींचं फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब7 नोव्हेंबर 2012 – केंद्रीय गृहमंत्र्यांची फाशीच्या आदेशावर सही 21 नोव्हेंबर 2012- सकाळी 7:30 वाजता फाशी देण्याची वेळ

close