महत्त्वाच्या ओएनजीसी प्रकल्पाची सुरक्षाव्यवस्था अजूनही गाफीलच

December 3, 2008 9:01 AM0 commentsViews: 2

3 डिसेंबर, मुंबईबाँबे हाय म्हणजे भारताच्या पेट्रोलियम मिनिस्ट्रीचा सरताज. भारताच्या एकूण तेलउत्पादनापैकी 35 तेलाचं उत्पादन या प्रकल्पातून होतं. याच्या सुरक्षेची जबाबदारी आहे ऑफशोअर कमांडोजवर. पण इकडे सुरक्षेसाठी आहे फक्त मच्छिमार बोटी. त्याही भाड्यानं घेतलेल्या. मोठ्या ट्रॉलर्सना रीगपासून अर्धा किलोमीटवर ठेवण्यासाठी या बोटींचा वापर केला जातो. पण स्फोटकांनी भरलेली एखादी छोटी बोट ही सुरक्षाव्यवस्था पार करू शकते. पण ताशी 40 नॉटिकल मैलानं धावणार्‍या बोटी घ्यायची नेव्हीलाही परवानगी नाही.या मासेमारी बोटीवरचे अधिकारीही फारशा जबाबदारीनं वागताना दिसत नाहीत. पेट्रोलियम मिनिस्ट्रीनं 2002 साली लक्ष्मीप्रसाद बोटीवरच्या कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी केली आहे. या बोटीवरचे अधिकारी दारू पिऊन आसपासच्या नागरिकांकडे लाच मागतात, असा आरोप आहे. नेव्हीच्या अधिकार्‍यांनी मात्र या घटनेचा इन्कार केलाय.इथली सुरक्षाव्यवस्था तपासण्यासाठी आमच्या रिपोर्टर्सनी फक्त दोन हजार रुपयात एक मासेमारी बोट भाड्यानं घेतली. या बोटीतनं रिकामी खोकी घेऊन आमचे रिपोर्टर्स प्रकल्पाकडे निघाले. या खोक्यांतून अगदी सहजपणे स्फोटकही नेता येऊ शकतात. भारतीय कस्टम हे नाव कितीही भारदस्त वाटलं, तरी सध्या त्यांच्या बोटी मोडकळीस आल्या आहेत. दाउदच्या बोटी समुद्रात मुक्तपणे फिरतात. 1993 च्या बॉम्बस्फोटानंतरही परिस्थिती बदललेली नाही. पोलिसांबरोबर चालू असलेली नौदलाची गस्तीही सध्या बंद झाली आहे. नेव्हीनच यातनं अंग काढून घेतलं, तर इथल्या सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारी घेणार कोण ? या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही. सीएनएन आयबीएनवर 2006 साली हा रिपोर्ट दाखवण्यात आला होता. मुंबईवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठीही अतिरेक्यांनी पुन्हा एकदा मुंबईपर्यंत पोहचण्यासाठी सागरी मार्गाचा वापर केला. आजही बाँबे हायच्या सुरक्षाव्यवस्थेत फारसे बदल झालेले नाहीत. मुंबईवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आता तरी यात बदल होणार का ? हाच खरा प्रश्न आहे.

close