आता कारवाई करण्याची पाकिस्तानची बारी

November 21, 2012 5:39 PM0 commentsViews: 13

सुहासिनी हैदर, नवी दिल्ली

21 नोव्हेंबर

कसाबच्या फाशीवर दहशतवादाचा पाकिस्तान निषेध करतं अशी सावध प्रतिक्रिया पाकिस्तान सरकारनं दिली आहे. पण भारताच्या दृष्टीनं आता पुढचं पाऊल असेल ते म्हणजे मुंबई हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तानात असलेल्या अतिरेक्यांना लवकरात लवकर शिक्षा होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं.

मुंबईवर सर्वात मोठा अतिरेकी हल्ला करणार्‍या अजमल कसाबला फाशी होताच देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या. पण कसाब ज्या देशाचा नागरिक होता त्या पाकिस्ताननं मात्र सावध भूमिका घेतली. पाकिस्तान सरकारनं तर कसाबच्या फाशीसंबंधी पत्रक स्वीकारायलाही नकार दिला. पाकनं पत्रक घेतलं नाही तेव्हा आम्ही त्यांना तो फॅक्स केला अशी माहिती परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी दिली.पण पाकिस्ताननं भारतानं दिलेलं पत्रक स्वीकारल्याचं एक अधिकृत पत्रक प्रसिद्ध करून सांगितलं आणि पाकिस्तानचा दहशतवादाला विरोध असल्याचीच री ओढली.सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आणि त्याच्या प्रचाराचा पाकिस्तान निषेध करतो आणि दहशतवादाच्या उच्चाटनासाठी सर्वच देशांशी सहकार्य करण्याची आमची इच्छा आहेपाकिस्तानचं हे मौन नवं नाही. दूतावासातल्या अधिकार्‍यांची भेट घेण्याची कसाबची मागणी पाकिस्ताननं प्रत्येक वेळी फेटाळली. इतकंच नाही तर कसाबच्या इतर 9 साथीदारांचे मृतदेह ताब्यात घ्यायलाही पाकिस्ताननं नकार दिला. कसाबच्या अटकेनंतर पाकिस्तानातल्या फरिदकोटमध्ये असलेलं त्याचं कुटुंब अतिशय संशयास्पद पद्धतीनं गायब झालं. पण आता कसाबला फाशी झालीय. या फाशीचा 26/11 हल्ल्यासंबंधी पाकिस्तानात सुरू असलेल्या खटल्यावर परिणाम नक्कीच होईल.

- 26/11 हल्ल्यातले पाकिस्तानातल्या 6 सुत्रधारांवर पाकिस्तानात सुरू असलेला खटला लवकरात लवकर मार्गी लागावा, यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढलाय – हल्ल्याच्या मास्टरमाईंडला पकडण्यासाठीही पाकिस्तान सरकारवर दबाव वाढलाय – कसाबची चौकशी करण्यासाठी त्याला ताब्यात द्यावं, या पाकिस्तानी अधिकार्‍यांच्या मागणीलाही आता पूर्णविराम मिळालाय – पण कसाबसच्या फाशीमुळे पाकिस्तानच्या तुरुंगात असलेला भारतीय नागरिक सरबजीत सिंगबाबत पाकिस्तान सरकार कठोर भूमिका घेऊ शकतं

भारतात दहशतवाद खपवून घेतला जात नाही आणि अतिरेक्यालाही त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी इथला कायदा देतो, हा संदेश कसाबच्या फाशीमुळे जगाला मिळालाय.

close