अमिताभ ‘मातोश्री’वर, ट्विटरवर प्रतिक्रिया

November 15, 2012 1:38 AM0 commentsViews: 9

15 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. बाळासाहेबांच्या प्रकृतीची बातमी कळताच हजारो शिवसैनिकांनी मातोश्रीकडे धाव घेतली. या गर्दीत अभिनेता अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि संजय दत्तही मातोश्रीवर दाखल झाले. बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपुस केल्यानंतर बिग बींनी ट्विटरवरून आपल्या भावना मोकळ्या केल्यात.

'बाळासाहेब हे लढवैय्या आहेत. आता प्रार्थनांची गरज आहे. 'कुली' चित्रपटाच्या सेटवर जेव्हा माझा अपघात झाला तेव्हा ते मला हॉस्पिटलमध्ये बघायला आले होते. त्यावेळी त्यांनी 'यमराज हरला' हे व्यंगचित्रही आणलं होतं. बाळासाहेबांच्या भाषेत, यमराजाला मी पराभूत केलं होतं. जर मी बाळासाहेबांसारखा व्यंगचित्रकार असतो तर आज मीही त्यांच्यासाठी एक व्यंगचित्र काढलं असतं. जेव्हा माझं आणि जयाचं लग्न झालं तेव्हा त्यांनी आम्हाला घरी बोलावलं होतं आणि काही विधीही केले. नव्या सूनेचं जसं स्वागत व्हायला हवं तसं त्यांनी केलं. आणि तेव्हापासून आमचे घरोब्याचे संबंध आहेत. जेव्हा बोफोर्स घोटाळ्यात माझं नावं आलं तेव्हा त्यांनी मला घरी बोलावलं आणि विचारलं, "तू खरचं या घोटाळ्यात आहेस का ?" जेव्हा मी नाही म्हटलं तेव्हा ते म्हणाले, "मग कसलीही चिंता करु नकोस. मी तुझ्याबरोबर आहे. निवांत रहा आणि तू तुझं काम कर"- अमिताभ बच्चन

'मातोश्री'वरून थेट लाईव्ह कव्हरेज पाहा – आयबीएन लोकमत आणि आयबीएन 7 वर

close