ऊसदराच्या आंदोलनाचा उद्रेक;शेट्टींचा जामीन अर्ज फेटाळला

November 15, 2012 12:58 AM0 commentsViews: 4

15 नोव्हेंबर

पश्चिम महाराष्ट्रात ऊस दराच्या आंदोलनाचा भडका उडाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 100 हून अधिक ठिकाणी रास्ता रोको आणि जाळपोळ करण्यात आली. तर पोलिसांनी 300 हून अधिक आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचा जामीन कोर्टानं इंदापूर फेटाळला आहे. शेट्टींवर 257 आणि 258 कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कलम 257 मध्ये त्यांना जामीन मिळाला. पण कलम 258 नुसार सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं याप्रकरणी जामीन नाकारला. बारामती कोर्टात आज राजू शेट्टींचे वकील नव्यानं जामीन अर्ज करणार आहेत.

बुधवारी करवीर तालुक्यात दिंडनेर्ली गावात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला होता. त्याला विरोध करण्यासाठी तिथं पोलीस पोहोचल्यावर आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरच दगडफेक केली. आणि पोलिसांना तिथून पळवून लावलं. त्यानंतर संतापलेल्या जमावानं पोलिसांची एक जीपही जाळली. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत धरपकड सुरू केली. कोल्हापूर-गारगोटी आणि राधानगरी हे दोन्ही राज्यमार्ग आंदोलनकर्त्यांनी बंद केले होते. ठिकठिकाणी रास्ता रोको करुन चक्काजाम करत टायर पेटवून आणि झाडं रस्त्यावर टाकून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला होता. तसंच अनेक ठिकाणी जमावानं पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तदाखल पोलिसांनीही जमावार लाठीमार केला. दरम्यान अनेक ठिकाणी शरद पवारांच्याही पुतळ्याचं प्रतिकात्मक दहन करण्यात आलंय. त्यामुळे उद्यादेखील हे आंदोलन चिघळण्‌ाची चिन्हं आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातले 500 हून अधिक रस्ते स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बंद करण्याचा प्रयत्न केलाय.

close