अतिरेक्यांसाठी दिल्लीतून खरेदी झाली सिम कार्ड्स

December 3, 2008 9:24 AM0 commentsViews: 3

3 डिसेंबर, मुंबई तोरल वारियामुंबईला दहशतवाद्यांनी तीनपेक्षा जास्त दिवस वेठीस धरलं होतं. आता सुरू असलेल्या चौकशीतून त्यावेळी नेमकं काय घडलं, याची माहिती हळूहळू समोर येतेय. हे अतिरेकी एकमेकांच्या आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या सतत संपर्कात होते, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. सूत्रांनी असंही सांगितलंय की दिल्लीहून सहा सिम कार्ड्स खरेदी करण्यात आले होते.मुंबईवर हल्ला करणार्‍या दहा अतिरेक्यांपैकी मोहम्मद अजमल कसाबला जिंवत पकडण्यात आलं आहे. काळा टी शर्ट घातलेल्या आणि हातात एके 47 घेतलेला मोहम्मद अजमल कसाब सहकार्‍यांसोबत दक्षिण मुंबईत खुलेआम गोळीबार करत होता. त्यांच्या इतर सहकार्‍यांनी ताज, ओबेरॉय हॉटेल आणि नरिमन हाऊसमध्ये अनेक लोकांना ओलीस ठेवण्यापूर्वी त्यांनी हे हत्याकांड केलं. अतिरेक्यांनी भारतातूनच सहा कार्ड खरेदी केल्याचं सूत्रांनी सांगितलंय. दिल्ली आणि कोलकात्याहून प्रत्येकी तीन कार्ड्स खरेदी करण्यात आले होते. हल्ल्याच्या काही दिवस अगोदरच हे कार्ड्स खरेदी करून पाकिस्तानला पाठवण्यात आले होते. हेच कार्ड्स पाकिस्तानहून मुंबईला येताना अतिरेक्यांनी सोबत आणले होते. लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद मुझ्झमिल यानं व्हाईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकोल सिस्टीमचा वापर करून अतिरेक्यांशी कॉन्फरन्स कॉल केला होता. हल्ल्याची जबाबदारी घेतलेल्या डेक्कन मुजाहिद्दीनच्या मेल लाहोरहून ज्या कॉम्प्युटरमधून आला होता, तोच हा कॉम्प्युटर होता. या अतिरेक्यांना लाहोरमधून पंजाबीत सूचना देण्यात येत होत्या, अशी माहितीही सूत्रांनी दिलीय. मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या हत्येनंतर अतिरेक्यांना लाहोरमधील म्होरक्याकडून आलेला अभिनंदनाचा कॉल गुप्तचर संस्थेनं टॅप केल्याचं सूत्रांनी सांगितलंय. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अतिरेक्यांच्या मोबाईलची बॅटरी संपल्यानंतर त्यांनी हॉटेलमधल्या लोकांच्या हँडसेट्चा वापर केला. नेमक्या कोणत्या हँडसेट्सचा अतिरेक्यांनी वापर केला हे शोधण्यासाठी हॉटेलमध्ये त्यावेळी असलेल्या 500 नंबर्सची पोलीस तपासणी करत आहेत. तपासातून असंही समजतंय की, अतिरेक्यांना कोड नेम्स देण्यात आले होते. एकाचं नाव ऑपरेशन व्हीटीएस होतं. अतिरेक्यांची जीपीएस सिस्टीमही सिझ करण्यात आलीय. मुंबई पोलिसांना एफबीआय त्यांच्या तंत्रज्ञानासह मदत करतंय. हल्ल्याचे सूत्रधार आणि हल्लेखोर यांच्यातलं कित्येक तासांचं संभाषण गुप्तचर संस्थांकडं उपलब्ध आहे.

close