हॉस्पिटलवर हल्ल्या प्रकरणी 9 जणांना अटक

November 20, 2012 10:12 AM0 commentsViews: 7

20 नोव्हेंबर

फेसबुकवर बंदला विरोध करणार्‍या मुलीच्या नातेवाईकांच्या हॉस्पिटलवर हल्ला केल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे. दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज्यात बंद पाळला गेला. या बंदला पालघरमधल्या एका मुलीनं फेसबुकवर कमेंट करत विरोध दर्शवला. तर तिच्या एका मैत्रिणीनं त्या कमेंटला लाईक केलं. या कमेंटमुळं भडकलेल्या काही जणांनी मुलीच्या नातेवाईकाच्या हॉस्पिटलमध्ये धुडगूस घातला. हॉस्पिटलमधल्या वस्तूंची मोडतोड केली होती. याप्रकरणी 9 जणांना रात्री उशीरा झाली अटक करण्यात आली आहे. या फेसबुक कमेंटबाबत सेनेच्या पालघर शहरप्रमुखानी पोलिसांत तक्रार केली. त्यामुळे पोलिसांनी त्या मुलींना अटक केली. पण नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. या दोघींवर कलम 505 आणि 62 लावण्यात आलंय. या मुलींवर धार्मिका भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांच्या कारवाईचे चौकशीचे आदेश

या सगळ्या प्रकारावर प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दोन पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. तसंच पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या पत्राला राज्य सरकारनं उत्तर पाठवलंय. पालघर प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचं यात सांगितलंय. पण हे पत्र मुख्यमंत्र्यांऐवजी गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अमिताभ राजन यांनी पाठवलंय. यावर काटजू यांनी पुन्हा एक पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी स्वत: आपल्याला उत्तर पाठवावं असं त्यांनी या नव्या पत्रात म्हटलंय. दरम्यान, पालघर पोलिसांच्या कारवाईची चौकशी करण्याचे आदेश कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे आयजी देवेन भारती यांनी दिले आहे.

close