दहशतवादी हल्ल्यातून वाचली तीन महिन्यांची शीतल

December 3, 2008 12:39 PM0 commentsViews: 3

3 डिसेंबर, मुंबईअलका धुपकरमुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे तीनशे लोक जखमी झाल्याची माहिती सरकारनं दिली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये गुजरातमधल्या वापीची एक मुलगी आहे. तिचं वय आहे फक्त तीन महिने. दहशतवादी हल्ल्यामध्ये वाचलेली ती सर्वात लहान मुलगी आहे.व्हीटी स्टेशनवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारातून चिमुकली शीतलही बचावली नाही. तिच्या शरीरात सहा ठिकाणी फुटलेल्या ग्रेनेडचे तुकडे गेलेयत. त्यातले तीन तर कधीच काढता न येणारे आहेत. "तिच्या स्पायनल कॉडच्या सुरवातीलाच एक तुकडा आहे. दुसरा नाकाजवळ आहे, तर तिसरा हाताच्या जॉईंटवर. ते तसेच शरीरात राहतील आणि त्याचं पॉयझनिंग सुरु होईल" असं जे. जे. हॉस्पिटलचे डॉक्टर सुयोधन रेड्डी यांनी सांगितलं. आता आयुष्यभर शितलला पॉयझनिंग न होण्याची औषधं घ्यावी लागणार आहेत.तीन महिन्यांच्या शीतलचे वडील उपेंद्र यादव व्हीटी स्टेशनवर दहशवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेयत. तर तिची आई जेजे हॉस्पिटलमध्येच उपचार घेतेय. वडील नाहीत आणि आई गंभीर जखमी असल्यामुळे सध्या जेजे हॉस्पिटलचा स्टाफच शीतलची काळजी घेतोय.शीतल सारखे अनेक जण या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेत. तीन दिवसांच्या संघर्षानंतर अतिरेक्यांना ठार करण्यात जरी यश आलं असलं तरी त्या दहशतवादी हल्ल्याचे परिणाम शितलसारख्या अनेकांना आयुष्यभर भोगावे लागणार आहेत.

close