‘शेतकरी संघटनेकडून सव्वा 2 कोटींची नुकसान भरपाई होणार’

November 23, 2012 9:42 AM0 commentsViews: 5

23 नोव्हेंबर

उसाला 3 हजार रुपयांचा भाव देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेनं ऐन दिवाळीच्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रात धुडगूस घातला होता. सलग तीन दिवस पश्चिम महाराष्ट्र या आंदोलनामुळे धुमसत होतं. या तीन दिवसात शेतकरी संघटनेकडून सरकारी, खासगी, पोलिसांच्या वाहनाची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली होती. यात सव्वा दोन कोटींचं नुकसान झालंय. या आंदोलनात झालेलं नुकसान आंदोलकांकडून वसूल करणार असल्याची घोषणा गृहमंत्री आर आर पाटील यांनी केली आहे. ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आणि इतर शेतकरी संघटनेसह शिवसेनेनं आंदोलन केलं या आंदोलनात तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मिळतेय. या आंदोलन काळात 12 एसटी गाड्या जाळल्या आहेत. तर 50 हून अधिक एसटींची तोडफोड केली. तसंच शासकीय वाहनांचंही नुकसान केलंय. ऊस वाहतूक करणार्‍या गाड्याही फोडण्यात आल्यात. अशा सुमारे 142 घटनांमध्ये तब्बल सव्वा 2 कोटींचं नुकसान झालंय. तर या ऊस आंदलनाच्या पार्श्वभूमीवर 1318 आरोपींना अटक करण्यात आली असून इतर सहभागी आंदोलकांचा शोध घेण्याचं काम सध्या सुरु आहे. आंदोलकांच्या हल्ल्यात 3 पोलीस अधिकारी आणि 16 पोलीस कर्मचारीही गंभीर जखमी झाले आहे. पोलीस महानिरीक्षक चव्हाण यांनी कोल्हापूर परिक्षेत्रातील अधिकार्‍यांची एक बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिलीय. दरम्यान आता कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्हातले बहूतांशी साखर कारखाने सुरु झाले असून त्यांच्याकडून 2500 चे हप्ता जाहीर करण्‌यात आलाय त्यामुळं ऊस दराचं आंदोलन आता शमलंय.

close