आंदोलकांनी बळजबरीने मुळा धरणाचं पाणी कालव्यात सोडलं

November 27, 2012 1:10 PM0 commentsViews: 9

27 नोव्हेंबर

औरंगाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांमधला पाण्याचा प्रश्न पेटू लागलाय. मुळा धरणातलं पाणी जायकवाडीला सोडण्याआधीच आंदोलनकर्त्यांनी ते कालव्यांमध्ये सोडलंय. मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी आधी शेतीला पाणी द्यावे, या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यात आज सकाळपासून रास्ता रोको करण्यात आला. सर्वपक्षीय नेत्यांनी त्याचं नेतृत्व केलं. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी स्वत:च कायदा हातात घेऊन कालव्याला पाणी सोडलं. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींचा दबाव आणि आक्रमक आंदोलक यांच्यापुढे प्रशासन काही करू शकलं नाही. दरम्यान, बेकायदेशीरपणे पाणी सोडल्याप्रकरणी दोनशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दुसरीकडे भाजपचे आमदार राम शिंदे यांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. पाणी समितीच्या बैठकीत जामखेडला पाणी सोडण्याचा निर्णय झाला असताना मध्यरात्रीत निर्णय बदलला गेला. जिल्हायचे पालकमंत्री बबनराव पाचपुतेंनी हा निर्णय बदलल्याचा शिंदे यांचा आरोप आहे.

close