‘मनसेच्या नगरसेवकाचं डोकं फिरलंय’

November 23, 2012 10:48 AM0 commentsViews: 21

23 नोव्हेंबर

इंदू मिलमध्ये बाळासाहेबांच्या स्मारकाची मागणी करणार्‍या मनसेच्या नगरसेवकाचं डोकं फिरलं आहे. मनसेच्या आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करा अशी घणाघाती टीका रिपाईंचे नेते रामदास आठवले यांनी केली. तसेच अशा नगरसेवकांना पक्षातून काढून टाकावे अशी मागणी राज ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलं. बाळासाहेबांच्या स्मारकाला आमचा विरोध नाही पण स्मारक हे शिवतीर्थावरच व्हावं अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारनंतर दुसर्‍याच दिवशी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांचं स्मारक शिवाजी पार्कवर व्हावं अशी मागणी केली होती. जोशी यांच्या मागणीनंतर सर्व शिवसेनेच्या नेत्यांनी ही मागणी लावून धरली मात्र काही दादरवासीयांनी याला विरोध दर्शवला. खुद्द उद्धव ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत स्मारकाबदल वाद घालू नये अशी हात जोडून विनंती केली होती. मात्र बुधवारी मुंबई महापालिकेच्या विशेष शोक सभेत सेनेच्या नगरसेवकांनी मागणी लावून धरली. यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या स्मारकाला आपला पाठिंबा जाहीर केला. मात्र यात काँग्रेस आणि मनसेच्या नगरसेवकांनी वेगळी मागणी करत खळबळ उडवून दिली. काँग्रेसच्या नगरसेविका नयना जोशी यांनी बाळासाहेबांचं नाव दादर स्टेशनला द्यावं अशी मागणी केली. तर मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी बाळासाहेबांचं स्मारक व्हावं पण ते शिवाजी पार्क ऐवजी इंदू मिलच्या जागेत उभारावं. त्यांचं व्यक्तीमत्व खूप मोठं आहे. त्यामुळे शिवाजी पार्क एक खेळाचं मैदान आहे आणि जागाही खूप कमी आहे. बाळासाहेबांचं आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी इंदू मिलची जागा मोक्याची आहे त्यामुळे तिथेच स्मारक व्हावं अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली. मनसेच्या या मागणीमुळे मात्र महायुतीची पंचाईत झालीय. आज रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत मनसेच्या नगरसेवकांचा समाचार घेतला. मनसेच्या नगरसेवकाचे डोकं फिरलं आहे त्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करा आणि त्याला पक्षातून बाहेर काढावे यासाठी मी स्वत: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेईल असं ठणकावून सांगितलं. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व्हावं अशी मागणी गेल्या वर्षांपासून रिपब्लिकन पार्टी करत आहे. अलीकडे भाजपनेही रिपाईसोबत आंदोलनात उतरली आहे. दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक व्हावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे पण याबाबत कोणताही वाद होऊ नये असं आवाहन गृहमंत्री आर आर पाटील यांनी केलंय.

close