मुंबई टेस्टमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव

November 26, 2012 10:05 AM0 commentsViews: 8

26 नोव्हेंबर

मायदेशातच पराभवाची नामुष्की भारतीय टीमवर ओढावली. मुंबई टेस्टमध्ये इंग्लंडनं भारताचा 10 विकेटनं पराभव केलाय. इंग्लंड दौर्‍यातील लाजीरवाण्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी असलेल्या भारतीय टीमला हा मोठा धक्का आहे.अहमदाबाद टेस्ट जिंकत विजयी सलामी देणार्‍या भारताला मुंबई टेस्टमध्ये हरवत इंग्लंडनं या सीरिजमध्ये 1 – 1 बरोबरी केली आहे. इंग्लंडच्या स्पीन बॉलिंगसमोर भारताची दुसरी इनिंग फक्त 142 रन्सवर ऑलआऊट झाली. भारतानं विजयासाठी ठेवलेलं 57 रन्सचं माफक आव्हान इंग्लंडनं सहज पार केलं. मुंबई टेस्टमध्ये संपूर्णपणे इंग्लंडचं वर्चस्व राहिलं. कॅप्टन ऍलिस्टर कुक आणि केविन पीटरसननं सेंच्युरी करत इंग्लंडला मोठा स्कोर उभारुन दिला. तर स्पीन बॉलर मॉन्टी पानेसर आणि ग्रॅमी स्वाननं भारताच्या झटपट विकेट घेत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

मुंबई टेस्टमध्ये भारतीय टीमचा लाजिरवाणा पराभव झाला आणि याचं खापर फुटलं ते सीनिअर खेळाडूंवर. यातही सचिन तेंडुलकरच्या कामगिरीवर सर्वाधिक चर्चा सुरु झाली आहे. मुंबई टेस्टमध्ये दोन्ही इनिंगमध्ये मिळून सचिनला फक्त 16 रन्स करता आलेत. त्याआधीच्या अहमदाबाद टेस्टमध्येही सचिन स्वस्तात आऊट झाला होता. गेल्या काही टेस्ट मॅचमध्ये सचिन मोठी खेळी करण्यात अपयशी ठरतोय. 2011-12 या वर्षात सचिन 11 टेस्ट मॅच खेळलाय आणि यात त्याला एकही सेंच्युरी करता आलेली नाही. त्याचं ऍव्हरेज 25 पेक्षाही खाली घसरला आहे. साहजिकच त्याच्या निवृत्तीच्या चर्चेनं आता पुन्हा एकदा जोर धरला आहे. काही माजी क्रिकेटपटूंनीही सचिनच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे.

close