गडकरींनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा -यशवंत सिन्हा

November 20, 2012 2:18 PM0 commentsViews: 17

20 नोव्हेंबर

भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी गडकरींच्या पूर्ती ग्रुपच्या व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. या सगळ्या प्रकरणात गडकरी दोषी असोत वा नसोत हा मुद्दा महत्त्वाचा नाही. पण सार्वजनिक जीवनात असणार्‍या व्यक्ती निष्कंलक असायला हवी अस मत सिन्हा यांनी व्यक्त केलंय. काहीदिवसांपुर्वी नितीन गडकरी यांच्या विरोधात राम जेठमलानी यांनीही बंड पुकारला होता. पण संघाने गडकरींची पाठराखण करत राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ गडकरींच्या गळात घातली. भाजपनेही दोनदा बैठक घेऊन गडकरींनी क्लीन चीट दिली आणि भाजप पुर्णपणे गडकरींच्या पाठीशी आहे असं स्पष्ट केलं. आज भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा गडकरींच्या राजीनाम्याची मागणी करत पक्षालाच घरचा अहेर दिला आहे.

भाजपचे वरिष्ठ खासदार यशवंत सिन्हा यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात काय म्हटलंय ?

'आमचे पक्षाध्यक्ष दोषी आहेत की नाही, हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की सार्वजनिक जीवनात असणार्‍यांनी निष्कलंक असायला हवं.पक्षांतर्गत व्यासपीठांवर बोलून थकल्यावर अतिशय दु:खानं हे पत्रक प्रसिद्ध करीत आहे. मी जो मुद्दा मांडलाय तो महत्त्वाचा असल्याचा मला विश्वास आहे आणि पक्ष त्यावर गांभीर्यानं कारवाई करेल, अशी आशा आहे, मी खूप प्रयत्न करूनही पक्ष याप्रकरणी निर्णय घेऊ शकला नाही. पक्षानं माझ्या सल्ल्यावरून अंशुमन मिश्रा यांना राज्यसभेचं तिकीट नाकारलं. या प्रकरणातसुद्धा पक्ष माझा सल्ला मान्य करतील, अशी मला आशा आहे. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजप लढा देईल, अशी आशा ज्यांना होती त्यांचीही या प्रकरणामुळे घोर निराशा झालीय. मला स्वत:साठी काही नको. मला माझ्या आयुष्यात सिद्ध करण्यासाठी काही उरलेलं नाही. पण भाजपतल्या प्रत्येकाला ताठ मानेनं जगता यावं, असं मला वाटतं. मी, नितीन गडकरी यांना अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की त्यांनी तत्काळ भाजप अध्यक्ष पदावरून पायउतार व्हावं. हा प्रश्न मी पक्ष कार्यकर्ते आणि जनतेपुढे मांडू इच्छितो. मी चुकत असेल तर मला तसं सांगा. मी बरोबर असेल तर जमेल त्या प्रकारे मला सहकार्य करा देश संकटात आहे. लोकशाही धोक्यात आहे आणि आपलं भविष्य परिपूर्णतेपासून खूप दूर आहे. अशावेळी भाजपनं पुढाकार घेऊन देश वाचवायला हवा.'- यशवंत सिन्हा

close