‘स्मारकं उभारण्यापेक्षा लोकोपयोगी प्रकल्प उभारा’

November 23, 2012 3:09 PM0 commentsViews: 11

23 नोव्हेंबर

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दिवसेंदिवस नव्या-नव्या मागण्या आणि त्यावर वाद उद्भवत आहे. एकीकडे शिवसेनेनं शिवाजी पार्कवर स्मारक व्हावे अशी मागणी केली आहे तर मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी स्मारक इंदू मिलमध्ये उभारावे अशी मागणी करून नवा वाद निर्माण केला. पण आज मनसेनं आपल्या नगरसेवकाचा मुद्दा खोडून काढला आहे. संदीप देशपांडे यांची मागणी ही व्यक्तीगत होती ती पक्षाची भूमिका नव्हती. पक्षाची भूमिका फक्त राज ठाकरे घेतात. पुतळे उभे करून स्मारकं करण्याला मनसेचा विरोध आहे त्यापेक्षा लोकोपयोगी प्रकल्प उभारून त्यांना महापुरुषांची नावे द्यावी अशी स्पष्ट भूमिका मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी एका पत्रकाद्वारे मांडली. अनिल शिदोरे यांनी काय म्हटलंय ?

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत काल संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये घेतलेली भूमिका ही मनसेची भूमिका नाही. पक्षाची भूमिका स्वतः राज ठाकरे जाहीर करत असतात. पुतळे उभे करून स्मारके करण्याला मनसेचा विरोध आहे. लोकोपयोगी प्रकल्प उभारून त्यांना महापुरुषांची नावे द्यावीत, अशी आमची भूमिका आहे. -अनिल शिदोरे, सरचिटणीस, मनसे

close