अखेर सिंचन श्वेतपत्रिका सादर

November 29, 2012 5:01 PM0 commentsViews: 60

29 नोव्हेंबर

अखेर कोट्यावधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यावर प्रकाशझोत टाकणारी श्वेतपत्रिका मंत्रिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आली आहे. मात्र आज या श्वेतपत्रिकेवर कोणतीही चर्चा होऊ शकली नाही. दोन खंडामध्ये श्वेतपत्रिका असणार असून पहिल्या खंडात सर्वसाधारण माहिती तर दुसर्‍या खंडात महत्वाच्या प्रकल्पांची माहिती असणार आहे. ही श्वेतपत्रिका सर्व जनतेला हाताळता यावी यासाठी राज्य सरकारच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मात्र या श्वेतपत्रिकेत नेमकं काय काय दडलंय हे मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आलंय.

आज संध्याकाळी सह्याद्री अतिथी गृहावर मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. 40 मिनिटे ही बैठक चालली. या बैठकीत श्वेतपत्रिका सादर करण्यात आली पण त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून श्वेतपत्रिकेबद्दल माहिती दिली. श्वेतपत्रिका ही दोन खंडात असणार आहे यात पहिल्या खंडात सर्वसाधारण आणि सिंचन प्रकल्पांची माहिती असणार आहे. तर दुसर्‍या खंडात पाचही महामंडळाच्या मोठ्या आणि महत्वाच्या प्रकल्पांची माहिती देण्यात आलेली आहे. ही श्वेतपत्रिका मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना देण्यात आली असून उद्यापासून ती राज्य सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या कमबॅकसाठी फिल्डिंग लावली आहे. पण श्वेतपत्रिकेवर अधिवेशनात चर्चा होणार असल्यामुळे अजितदादांचे कमबॅक लांबणीवर गेले आहे.

close