फेसबुक कमेंट प्रकरणी 2 पोलीस अधिकारी निलंबित

November 27, 2012 9:55 AM0 commentsViews: 16

27 नोव्हेंबर

पालघर फेसबुक कमेंट प्रकरणी अखेर दोन अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आलं आहे. ठाणे ग्रामीणचे एसपी रवींद्र सेनगावकर आणि पालघरचे पोलीस इन्स्पेक्टर श्रीकांत पिंगळे यांना निलंबित करण्यात आलंय. गृहमंत्री आर आर पाटील यांनी ही घोषणा केली. त्याचबरोबर या दोघांची विभागीय चौकशीदेखील केली जाणार आहे. तसंच हायकोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालघरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांची तडकाफडकी बदली केली आहे. रामचंद्र बगाडे असं या न्यायदंडाधिकार्‍यांचं नाव आहे. बगाडे यांनी या दोन्ही मुलींची प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर राज्यभरात स्वंघोषित बंद पुकारण्यात आला होता. या बंदला विरोध करत पालघर येथे राहणारी शाहीन धडा या तरुणीनं आपल्या फेसबुक अकाऊंटवर ठाकरेंसारखी लोकं रोज जन्मतात आणि मरतात मग यासाठी बंद करण्याची काय गरज आहे ? अशी कमेंट केली होती. तिच्या या कमेंटला तिच्या मैत्रिणीनं लाईक केलं. पण या कमेंटमुळे भडकलेल्या काही शिवसैनिकांनी मुलीच्या नातेवाईकाच्या हॉस्पिटलमध्ये दगडफेक केली. हॉस्पिटलमध्ये घुसून फर्निचर, उपकरणाची तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी त्या मुलीलाच अटक केली. आणि काही दिवसांने जामीन दिला. मात्र या प्रकारावर प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून या प्रकरणी पोलिसांच्या चौकशीची मागणी केली होती. अशी अटक करणं हे लोकशाहीच्या विरूध्द असल्याचं काटूज यांनी म्हटलं होतं. जामीन झाल्यानंतर या मुलींना माध्यमांशी संवाद साधला झालेल्या प्रकरणाबद्दल मुलींना माफी मागतील तसंच आम्हाला अटक अयोग्य होती असंही स्पष्ट केलं.

close