इंदू मिलच्या हस्तांतरणाची संसदेत घोषणा

December 5, 2012 5:07 PM0 commentsViews: 9

05 डिसेंबर

डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळावी म्हणून गेली अनेक वर्ष सुरु असलेला लढा आज अखेर यशस्वी झालाय. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची साडे बारा एकर जमीन हस्तांतरीत करण्यात येत असल्याची घोषणा आज संसदेत करण्यात आली. राज्यसभेत राजीव शुक्ला यांनी तर लोकसभेत वस्त्रोद्योगमंत्री आनंद शर्मा यांनी याबाबतची घोषणा केली. या घोषणेनंतर देशातील आंबेडकरी जनतेत आनंदाला उधाण आलंय. स्मारकासाठीच्या जमीनीसाठी संघर्ष करणार्‍या कार्यकर्त्यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी हस्तांतरीत केल्यामुळे आता इंदू मिलच्या या जागेवर समतेचा संदेश देणारं आंतराष्ट्रीय स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहेत.

तसेच स्मारकासाठी जागा हस्तांतराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय. या जागेच्या बदल्यात राज्य सरकार एनटीसीला पाच लाख स्क्वेअरफुटापेक्षा जास्त टीडीआर देणार आहे. या स्मारकासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्किटेक्ट नेमले जाणार आहेत. त्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे. गेल्या 1 डिसेंबर 2011 ला इंदू मिलच्या जागेचं स्पेशल आय- 3 हे आरक्षण बदलण्यात आलं. आणि त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी जागा आरक्षित करण्याचा अध्यादेश काढण्यात आलाय. ही जागा कोणत्याही व्यापारी कारणासाठी वापरली जाणार नाही.

close