ज्येष्ठ सतारवादक पंडित रवीशंकर यांचं निधन

December 12, 2012 9:16 AM0 commentsViews: 26

12 डिसेंबर 2012

भारतीय अभिजात संगीताची जगाला ओळख करून देणारे महान सतारवादक भारतरत्न पंडित रवीशंकर यांचं आज सकाळी अमेरिकेतल्या सॅन डियागो इथं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. भारतीय संगिताचे अर्ध्वयु उस्ताद अल्लाउद्दीन खाँ साहेबांचे शिष्य असलेल्या रविशंकर यांनी भारतीय वाद्य संगिताचा बाज जगापर्यंत पोहोचवला. नवे नवे राग रचले. 1960 च्या दशकात पंडित रविशंकर यांनी गुरूबंधू अलिअकबर खाँ, तबला वादक अल्लारखाँ यंाच्या साथीनं जगभरात संगिताचे कार्यक्रम सादर केले आणि त्यांना चाहत्यांचं अलोट प्रेम मिळालं. त्यानंतरच खर्‍या अर्थानं भारतीय संगिताची ओळख पाश्चिमात्य जगाला झाली.

महान सतारवादक भारतरत्न पंडित रविशंकर…भारतीय शास्त्रीय संगीत जगासमोर पोहोचवणारे ते पहिले कलाकार…1920 मध्ये बनारसमध्ये पंडितजींचा जन्म झाला. पंडितजींचा संगीताचा प्रवास सुरु झाला 1938 पासून…पंडितजींचे थोरले भाऊ उदय शंकर हे प्रख्यात नर्तक होते. पण 1938 ला नृत्यसोडून पंडितजींनी भारतीय संगीत क्षेत्राचे पितामह उस्ताद अल्लाउद्दीन खान यांच्याकडे सतार वादनाचे धडे गिरवले. 1944 मध्ये आपलं संगीताचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पंडितजींनी संगीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. सत्यजित रे यांच्या अपू ट्रायलोजीला त्यांनी संगीत दिलं.

त्याचबरोबर ऑल इंडिया रेडिओवरही पंडितजींनी 1949 ते 1956 संगीतकार म्हणून काम केलं. 1960 च्या दशकात पंडित रविशंकर यांनी गुरूबंधु अलिअकबर खाँ, तबला वादक अल्लार खाँ यंाच्या साथीनं जगभरात संगीताचे कार्यक्रम सादर केले आणि त्यांना चाहत्यांचे अपार प्रेम मिळाले. त्यानंतरच खर्‍या अर्थानं भारतीय संगीताची ओळख पाश्चिमात्य जगाला झाली. अप्रतिम लयकारीबरोबरच आपल्या अनोख्या सादरीकरणानं ते मैफल सजवत असत.पाश्चिमात्य संगीताबरोबरच मेळ साधणारं भारतीय संगीत म्हणजेच फ्युजन संगीताचा अविष्कारही त्यांनीच आधी जगाला दाखवून दिला.

सुप्रसिध्द बिटल्स ग्रुप बरोबरच जगप्रसिध्द व्हायोलीन वादक यहुदी मेनन आणि गिटार वादक जॉन मॅक्लागन यांच्यासारखा अनेक पाश्चिमात्य संगींतरकाराबरोबर त्यांनी फ्युजन सादर केलं. पंडितजींना आत्तापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. पण संगीत जगतातील सर्वोच्च असे 3 ग्रॅमी पुरस्कार पंडितजींना मिळाले. 2013 च्या ग्रॅमी पुरस्कारासाठीही पंडितजींचं नामांकन झालं होतं. त्यांच्या प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सनंही दखल घेतलीये. 1999 साली पंडितजींना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कारानं सन्मानीत केलं गेलं. पंडितजींच्या जाण्यानं भारतीय संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

close