अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान

December 7, 2012 9:15 AM0 commentsViews: 6

07 डिसेंबरसिंचन घोटाळ्यावरुन उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार्‍या अजित पवारांचा आज पुन्हा राज्यमंत्रिमंडळात समावेश झाला आहेत. राजभवनातल्या दरबार हॉलमधल्या झालेल्या छोटेखानी सोहळ्यात राज्यपाल के शंकरनारायणन यांनी अजित पवारांना मंत्रिपदाची शपथ दिली. या सोहळ्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मंत्रिमंडळातले अनेक मंत्री उपस्थित होते. यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं जाताना आपल्यावरचे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा अजितदादांनी केला. सिंचन पत्रिकेत राज्याची सिंचनाची टक्केवारी वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रकल्पांच्या किंमती कशामुळे वाढल्या तेही स्पष्ट झालेलं आहे. सर्व प्रमुख प्रकल्पांचा लेखाजोखा देण्यात आलेला आहे. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, तरीसुद्धा विधिमंडळातल्या कुठल्याही चर्चेला सामोरं जाण्याची आपली तयारी आहे असं अजित पवारांनी सांगितलं आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रपदाची शपथ घेतल्यानंतर बारामती, सांगलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शपथविधीबाबत घोळ

उपमुख्यमंत्रीपदाला घटनात्मक दर्जा नाही. पण तरीसुद्धा अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शेवटपर्यंत अजित पवारांच्या मंत्रिपदाच्या शपथेबाबत घोळ सुरू होता. गुरुवारी मुख्यमंत्री कार्यालयानं मुख्य सचिवांच्या कार्यालयाला अजित पवारांच्या शपथविधीविषयीची माहिती दिली. पण अजित पवार हे कॅबिनेट मंत्री म्हणून की, उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार हे स्पष्ट नव्हतं. त्यामुळं मुख्यमंत्री कार्यालयानं मंत्रिपदाचं आणि उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथेचं पत्र तयार केलं. आज अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे सकाळी नऊ वाजता उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथेचं पत्र राज्यपालांना सादर करण्यात आलं. त्यानुसार अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथेचा कायदेशीर घोळ झाल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. खरं तर, युती सरकारच्या काळात जेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली त्यावेळी राज्य सरकारनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करून त्यात उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक पद नाही तर ही राजकीय सोय आहे असं नमूद केलं. तसंच अजित पवारांच्या आधीसुद्धा अनेकांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे.

close