रोहयो घोटाळ्यातील दोषींना पाठीशी घालण्याचा जि.प.चा प्रयत्न

December 15, 2012 12:35 PM0 commentsViews: 14

15 डिसेंबर

अहमदनगरमधल्या पाथर्डीतल्या रोजगार हमी योजनेच्या गैरव्यवहारात अधिकार्‍यांना पाठीशी घातलं जातंय. या प्रकरणाचा अहवाल दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून ग्रामसेवक आणि शाखा अभियंता यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचं पत्र 9 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आलं होतं मात्र, अहमदनगरच्या जिल्हा परिषदेनं ते दडवून ठेवल्याचं पुढे आलंय.

रोजगार हमी योजनेतल्या घोटाळ्याचं आणखी एक उदाहरण अहमदनगरमधल्या शंकरवाडी गावात समोर आलंय. गावातला ग्रामसेवक आणि काही अधिकार्‍यांनी मिळून रोजगार हमी योजनेच्या मजुरीवर डल्ला मारलाय. त्यामुळे दुष्काळानं होरपळलेल्या शेतकर्‍यांना रोजगार हमी योजनेचेही पैसे मिळालेले नाहीत. कायम दुष्काळग्रस्त असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातलं हे शंकरवाडी गाव…दोन वेळच्या जेवणासाठी वणवण करावं लागणार्‍या इथल्या गावकर्‍यांची घोर फसवणूक झालीय. रोजगार हमी योजनेअंतर्गत गावातल्या 180 जणांनी 90 दिवस काम केलं. दररोज दीडशे रुपये प्रमाणं त्यांची मजुरी होते साडे तेरा हजार रुपये… पण त्यांना मिळाले फक्त 900 रुपये…

गावकर्‍यांनी 90 दिवस काम करूनही त्यांना फक्त 60 दिवसांची मजुरी देण्यात येईल, असं सांगण्यात आलं. पण त्यातही त्यांच्या नावे पोस्टात जमा झालेले पैसे कोर्‍या कागदावर सह्या घेऊन काढण्यात आले आणि गावकर्‍यांना जेमतेम एका आठवड्याची मजुरी मिळाली. ग्रामसेवक हिरामण दत्तू गवारे, पोस्टमास्तर आय. एम. सय्यद आणि शाखा अभियंता गड्डे यांनी आपली कष्टाची कमाई हडप केल्याचा गावकर्‍यांचा आरोप आहे. संबंधित आरोपींवर कारवाईचे आदेश देण्यात आलेत. पण खरा प्रश्न आहे तो दोषींना शिक्षा कधी होणार आणि गावकर्‍यांचे पैसे कधी मिळणार हा ?

close