तिढा सोडवा, कामकाज सूरू करा -पवार

December 15, 2012 3:05 PM0 commentsViews: 14

15 डिसेंबर

विरोधकांनी विरोध करणे हे नेहमीच पण चर्चाच होऊ द्यायची नाही याचा अर्थ म्हणजे मत मांडू द्यायचा नाही अशी भूमिका घेणं कितपत योग्य आहे. विरोधकांना मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे तितकाच सरकारलाही आहे त्यामुळे वाद सोडून चर्चा करावी असा वडिलकीचा सल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोधक आणि सत्ताधार्‍यांना दिला. नवी मुंबईत शरद पवार यांच्या हस्ते वंडर्स पार्कचे उद्घाटन झाले यावेळी ते बोलत होते.नागपूर हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा पूर्ण वाया गेला. पण अधिवेशनाला सुरूवात होण्याअगोदरच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घाईगडबडीत स्वत:चाच पुन्हा 'राज्यभिषेक' करून घेतला. मात्र अजित पवारांच्या पुनराआगमनामुळे विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच शिवसेना,भाजपने अजित पवारांच्या शपथविधी घटनाबाह्य आहे असा आरोप करत पहिल्या दिवशी गोंधळ घातला. शिवसेनेनं आघाडी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला पण विरोधकांची ऐकी नसल्यामुळे हा प्रस्ताव सपशेल फेटाळून लावण्यात आला. सिंचन घोटाळ्यावरून सादर करण्यात आलेल्या श्वेतपत्रिकवर विरोधक कडाडून बरसले. भाजपने याचा निषेध करत काळीपत्रिका सादर केली. या काळ्या पत्रिकेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आज सत्यपत्रिका प्रसिद्ध केली.

या पत्रिकेतून सिंचनाचं सत्य मांडल्याचा दावा राष्ट्रावादी काँग्रेसनं केला. गृहमंत्री आर.आर.पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. सिंचनावर 70 हजार कोटी नाही तर 30 हजार कोटींचा खर्च केल्याचा दावा या सत्यपत्रिकेत करण्यात आलाय. भाजपनं काळ्या पत्रिकेतून चुकीची माहिती दिल्यानं भाजपनं माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीनं केलीय. तसंच गरज पडली तर विरोधकांवर बदनामीचा खटला भरण्याचा इशारा गृहमंत्री आर.आर पाटील यांनी दिलाय. तर राष्ट्रवादीच्या या सत्यपत्रिकेची कुणकुण लागताच भाजपनं राष्ट्रवादीच्या आधीच पत्रकार परिषद घेत सत्यावर घाव अशी पत्रिका प्रसिद्ध करुन राष्ट्रवादीचे दावे फेटाळले आहे.

दरम्यान, सिंचन घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे चौथ्या दिवशीही विधानसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. त्यानंतर विधानभवन परिसरात शिवसेनेच्या आमदारांनी श्वेतपत्रिकेची होळी केली आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे विरोधकांच्या आक्रमणाला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत विधासभेच्या पायर्‍यावर ठिय्या आंदोलन केलं. अधिवेशनाचा संपूर्ण आठवडा गोंधळात गेला. जनतेच्या प्रश्नाचा कुठेच उल्लेखही झाला नाही.

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेऊन विरोधक आणि सत्ताधार्‍यांना चर्चा करण्याचा वडिलकीचा सल्ला दिला. विरोधकांनी विरोध करणे हे नेहमीच पण चर्चाच होऊच द्यायाची नाही याचा अर्थ मत मांडू द्यायचा नाही अशी भूमिका घेणं कितपत योग्य आहे. विरोधकांना मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. तितकाच शासनालाही आहे त्यामुळे वाद सोडून चर्चा करावी. या चर्चेवर जनता काय निर्णय घ्यायचा आहे ती घेईल त्यामुळे विरोधक आणि सत्ताधार्‍यांना सामजंस्याची भूमिका घेऊन अधिवेशनाचे कामकाज सुरू करावे असं आवाहन पवारांनी केलं आहे.

शिवसेनेनं अटींचं पालन करावं -शरद पवार

बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारासाठी परवानगी देताना घातलेल्या अटींचं पालन संबंधितांनी करायला हवं असं मत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलंय. तर मनोहर जोशींनी आपल्या बाबात केलेल्या वक्तव्याकडे गंभीरपणे पाहाण्याची गरज नाही असंही ते म्हणाले. पवारांनी एनडीएमध्ये यांवं आम्ही त्यांना पंतप्रधानपद देऊ असं वक्तव्य मनोहर जोशींनी काही दिवसांपुर्वी केलं होतं.

close