गुळाचा गोडवा दरामुळे कडवट

December 15, 2012 3:26 PM0 commentsViews: 26

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

15 डिसेंबर

कोल्हापूर जिल्ह्यातला गुळ उत्पादक सध्या संकटात सापडला आहे. फक्त चवीच्या आधारावरच गुळाचा दर ठरवला जात असल्यानं शेतकर्‍याला नुकसान सहन करावं लागतंय. त्यामुळे गुळाच्या दराबाबत योग्य पद्धत ठरवण्याची मागणी शेतकरी करत आहे.

कोल्हापूर बाजार समितीत शेतकरी गुळाच्या ढेपा घेऊन बाजारात येतोय, खरा पण त्याला योग्य तो भाव हा मिळत नाही. गुळाचा दर ठरवण्याच्या शास्त्रीय पद्धतीच्या अभावानं गुळाची चव चाखून त्याचा दर निश्चित केला जातोय. त्यातच उत्पादन खर्चही अधिक असल्यानं शेतकर्‍यांची परवड होतेय.

जिल्ह्यात हजारांहून अधिक गुर्‍हाळघरं आहेत. गुळाचं उत्पादन विक्रमी आहे. तरीही या उद्योगाला दर्जा आहे तो फक्त कुटीरउद्योगाचा..शेतकर्‍यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि गुळाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढे सरसावली. सरकारनं गुळाचा दर ठरवून शेतकर्‍यांचं होणार नुकसान टाळावं, अशी मागणी त्यांनी केली. एकीकडे शेतकर्‍यांचं हे नुकसान होत असतानाच दुसरीकडे मात्र प्रशासनानंही याची दखल घेतली नाही आणि त्यातच बाजार समितीनंही शेतकर्‍यांकडे पाठ फिरवली आहे.

close