कोंडोलिझा राईस यांच्याकडून पाकवर दबाव

December 4, 2008 8:38 AM0 commentsViews: 8

4 डिसेंबरमुंबईत दहशतवाद्यांनी हल्ला केला त्या घटनेला एक आठवडा पूर्ण झाला. पण तो हल्ला करणारे मास्टरमाइंड्स अजूनही पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरतायत. भारताला हव्या असलेल्या या वीस मोस्ट वाँटेड गुन्हेगारांना भारताकडे सोपवायला पाकिस्तान तयार आहे, असं पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी म्हटलं होतं. पण नंतर त्यांनी घुमजाव केला आणि हस्तांतरण करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळं दाऊद इब्राहिम आता भारताच्या ताब्यात मिळण्याची शक्यता धुसर झालीय. असं असलं तरी याबाबतीत भारताला पाकिस्ताननं सहकार्य केलंच पाहिजे असा सज्जड दम अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री कोंडोलिझा राईस यांनी दिलाय.अंडरवर्लड डॉन दाऊद इब्राहिम, जैशे मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर आणि असे 18 अट्टल गुन्हेगार आजही पाकिस्तानात आहेत. ते पाकिस्तानात बसून भारतावरील अतिरेकी हल्यांची आखणी करतात. मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यांमागेही पाकिस्तानी अतिरेक्यांचा हात आहे, असे पुरावे आहेत. सीएनएन आयबीएनशी बोलताना पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी भारताला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं होतं. पुरावे दिले, तर दाऊद इब्राहिमला सुद्धा भारताच्या हवाली करू, असं ते म्हणाले होते. पण आता त्यांनी घुमजाव केलाय. भारतानं संशयित अतिरेक्यांचे पुरावे जरी दिले तरी त्यांना भारतात पाठवलं जाणार नाही, असं त्यांनी जाहीर केलं. "भारताकडून अजून आम्हाला कुठलाही पुरावा मिळालेला नाही. त्यामुळं आम्ही त्यांना कोणतेही मोस्ट वाँटेड गुन्हेगार भारताला सोपवणार नाही. यापुढं पुरावे मिळाले, तर त्याचा विचार करू" असं पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी म्हणाले.हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत भेटीवर आलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री कोंडोलिझा राईस यांनी मात्र याच मुद्यावरून पाकिस्तानला दम भरला. "वस्तुस्थिती आणि निकड लक्षात घेऊन पाकिस्तानं सहकार्य केलंच पाहिजे" असं त्या म्हणाल्या. पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव येण्याची ही काही पहिली वेळ नाही. पण यापूर्वीही असा दबाव येऊन पाकिस्तानने भारताला कोणतीही मदत केली नाही. पाकिस्तानी सैन्य हे अतिरेक्यांची पाठराखण करतं आणि तिथलं अशक्त सरकार केवळ पाहात राहण्यापलीकडे काहीच करू शकत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे आता अमेरिकेने आणलेल्या दबावाचा कितपत फायदा होईल, याबाबत शंकाच आहे.

close