पत्रिकांचा राडा, कामाचा चुराडा

December 13, 2012 2:51 PM0 commentsViews: 5

13 डिसेंबर

गोंधळ, गदारोळ, अविश्वास प्रस्ताव आणि विविध रंगी पत्रिकांमुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचं चार दिवसांचं कामकाज वाहून गेलंय. या चार दिवसात विरोधक आणि सत्ताधारी असाच आखाडा रंगला. मात्र जनतेच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालंय. सिंचनावरच्या पत्रिकेवरून मात्र सर्व पक्षांत युद्ध रंगलंय.

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होण्याअगोदरच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घाईगडबडीत स्वत:चाच पुन्हा 'राज्यभिषेक' करून घेतला. मात्र अजित पवारांच्या पुनराआगमनामुळे विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच शिवसेना,भाजपने अजित पवारांच्या शपथविधी घटनाबाह्य आहे असा आरोप करत पहिल्या दिवशी गोंधळ घातला. शिवसेनेनं आघाडी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला पण विरोधकांची ऐकी नसल्यामुळे हा प्रस्ताव सपशेल फेटाळून लावण्यात आला. सिंचन घोटाळ्यावरून सादर करण्यात आलेल्या श्वेतपत्रिकवर विरोधक कडाडून बरसले. भाजपने याचा निषेध करत काळीपत्रिका सादर केली. या काळ्या पत्रिकेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आज सत्यपत्रिका प्रसिद्ध केली. या पत्रिकेतून सिंचनाचं सत्य मांडल्याचा दावा राष्ट्रावादी काँग्रेसनं केला. गृहमंत्री आर.आर.पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय.

सिंचनावर 70 हजार कोटी नाही तर 30 हजार कोटींचा खर्च केल्याचा दावा या सत्यपत्रिकेत करण्यात आलाय. भाजपनं काळ्या पत्रिकेतून चुकीची माहिती दिल्यानं भाजपनं माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीनं केलीय. तसंच गरज पडली तर विरोधकांवर बदनामीचा खटला भरण्याचा इशारा गृहमंत्री आर.आर पाटील यांनी दिलाय. तर राष्ट्रवादीच्या या सत्यपत्रिकेची कुणकुण लागताच भाजपनं राष्ट्रवादीच्या आधीच पत्रकार परिषद घेत सत्यावर घाव अशी पत्रिका प्रसिद्ध करुन राष्ट्रवादीचे दावे फेटाळले आहे. दरम्यान, सिंचन घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे चौथ्या दिवशीही विधानसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. त्यानंतर विधानभवन परिसरात शिवसेनेच्या आमदारांनी श्वेतपत्रिकेची होळी केली आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली. एकंदरीतच गेली चार दिवस महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांना हरताळ फासत अधिवेशनाचा आखाडा सत्ताधारी विरूद्ध विरोधक असाच रंगलाय.

close