गुजरातमध्ये नरेंद्र मोदींची हॅटट्रिक ; हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता

December 20, 2012 5:25 AM0 commentsViews: 39

20 डिसेंबर

गुजरात आणि हिमाचलप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज स्पष्ट झाले असून गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी हॅटट्रिक साधली आहे. भाजपने 116 जागा पटकावत सत्ता कायम राखली आहे. मात्र मोदींनी विजय मिळवला असला तरी त्यांना एक मोठा धक्काही बसलाय. मोदींच्या मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांना मात्र मतदारांनी घरी बसवलंय. धक्कादायक बाब म्हणजे गृह राज्यमंत्री, कृषीमंत्री, आरोग्यमंत्री आणि युवक कल्याणमंत्र्यांना पराभूत व्हावं लागलंय. तर दुसरीकडे हिमाचलप्रदेशमध्ये अटीतटीच्या लढतीत काँग्रेसने बाजी मारलीय. इथं काँग्रेसने सर्वाधिक 36 जागा पटकावत भाजपला धक्का दिलाय. काँग्रेसने बहुमतचा आकडा पार केला असून सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. गुजरातचा सरदार कोण होणार ? या प्रश्नाचे उत्तर निकालाअगोदरच गुजरातच्या जनतेनं दिलं होतं. गुजराती मनाने तब्बल पाच वेळा भाजपच्या सत्तेचा स्विकार केला आहे. यंदाही हीच पसंती जनतेनं दिलीय. आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होताच भाजपने आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला. मात्र मागिल निवडणुकीत भाजपने 117 जागा पटकावल्या होत्या. यंदा मात्र एक जागा कमी झाली असून 116 जागापर्यंत धाव घेता आली. गुजरातमध्ये मात्र काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं. काँग्रेसला 60 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. निकाल जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

या विजयानंतर मोदी यांनी आपली मातोश्रींचे आशीर्वाद घेऊन जनतेचे आभार मानण्यास बाहेर पडले. सर्वप्रथम त्यांनी घर गाठलं ते केशुभाई पटेल यांचं. केशुभाई पटेल यांनी बंडखोरी करून निवडणुकीच्या मैदानात उतरले. पण त्याच्या जीपीपी (गुजरात परिवर्तन पार्टी) ला फक्त दोनच जागा कमवत्या आल्या. मोदींनी केशुभाईंच्या घरी जाऊन त्याना पेढा भरवला आणि त्यांचे आभार मानले. सलग तिसर्‍यांदा गुजरातमध्ये राज्यकारभाराच्या 'गादी'वर मोदी विराजमान होणार आहे. पण यंदाच्या निवडणुकीत मोदी विरूद्ध काँग्रेस असा सामना रंगला होता. या सामन्यात मोदींनीच बाजी मारली. काँग्रेसला इथं पराभव पत्कारावा लागला. पण 60 जागा काबिज करत मोठा विरोधी पक्ष ठरला आहे.

मोदींचा हा विजय त्याच्या नावाच्या करिश्मावर प्राप्त झालाय. पण हिमाचलमध्ये काँग्रेसने या भाजपच्या सत्तेला सुरूंग लावत पूर्ण परतफेड केली. इथं भाजपला सपाटून पराभव स्विकारावा लागला. मागिल निवडणुकीत भाजप काठावर पास झाला होता. यंदा मात्र 26 जागा जिंकता आल्यात. तर काँग्रेसने 36 जागा जिंकून हिमाचलमध्ये झेंडा फडकावला आहे. एकंदरीच काँग्रेसने दोन्ही ठिकाणी एकूण 96 जागा बळकावून काँग्रेसने 'हम भी किसी से कम नही' दाखवून दिलंय. तर भाजपने दोन्ही ठिकाणी एकूण 142 जागा जिंकून 2014 च्या निवडणुकांअगोदर आपली झलक दाखवली आहे. गुजरातमध्ये मोदींच्या हॅटट्रिकमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय.

close