‘ति’ला अखेरचा निरोप

December 30, 2012 7:06 AM0 commentsViews: 16

30 डिसेंबरदिल्ली सामूहिक बलात्कार पीडित तरूणीवर आज सकाळी दुखद वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंगापूरहून विशेष विमानाने तिचं पार्थिव पहाटे दिल्लीत आणण्यात आलं. तिचे कुटुंबीय जवळचे नातेवाईक आणि गृहराज्यमंत्री आरपीएन सिंग यांच्या उपस्थिती तरूणीला अखेरचा निरोप देण्यात आला. तिच्या जाण्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. सरकारने तरूणीला योग्य न्याय द्यावा अशी मागणी सर्वस्थरातून होत आहे.दिल्लीत सामूहिक बलात्कार पीडित तरूणींनीची 13 दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. शुक्रवारी रात्री सव्वा दोन वाजता तीचा मृत्यू झालाय. तिला वाचवण्यास डॉक्टरांनी अटोकात प्रयत्न केले पण अपयश आलं. दिल्लीत उपचार सुरू असताना गुरूवारी प्रकृती खालावल्यामुळे सिंगापूर येथील माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आलं होतं. गेली दोन दिवस डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर शुक्रवारी रात्री डॉक्टरांनी 'नातेवाईकांना बोलावून घ्या' असा अखेरचा निरोप धाडला. रात्री सव्वा दोन वाजता अखेर तिची प्राणज्योत मालावली. तिच्या निधनाची बातमी वार्‍यासारखी पसरली अन् दिल्ली पुन्हा एकदा हादरली,स्तब्ध झाली. जंतरमंतरवर तरूणाईने श्रद्धांजली वाहण्यासाठी गर्दी केली. शांतीपूर्ण तरूणाईने निषेध केला आणि न्याय हवा द्या अशी आर्त हाक दिली. तिच्या मृत्यूमुळे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी,पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि सर्वच मंत्री,नेते,बॉलिवूडचे कलाकार यांनी दुख व्यक्त केलं. आज पहाटे तिचं पार्थिव एका विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आलं. यावेळी विमानतळावर 'देशाच्या बेटी'साठी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी हजर होते. त्यानंतर तिच्या कुटुंबीय आणि जवळचे मोजकेच नातेवाईक आणि गृहराज्यमंत्री आरपीएन सिंग यांच्या उपस्थित तरूणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या निधनामुळे देशभरातून तिला न्याय देण्यात यावा आणि भविष्यात अशा प्रकरणासाठी कठोर कायदे करण्यात यावे अशी मागणी सर्व स्थरातून केली जात आहे.

close