सचिनचा वन डेला अलविदा : एका पर्वाचा अस्त !

December 23, 2012 11:59 AM0 commentsViews: 7

23 डिसेंबर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय आणि याबरोबरच 23 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीतल्या एका पर्वाचाअस्त झाला. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेंच्युरी, सर्वाधिक रन्स करत सचिनच्या नावावर आहेत आणि हा रेकॉर्ड भविष्यात कोणी तोडेल याची शक्यताही कमी आहे.

बीसीसीआयचा हा ईमेल मीडियाच्या ऑफिसमध्ये धडकला आणि क्रिकेटमधील एका पर्वाचा अस्त झाला. 23 वर्षांपूर्वी 1989 मध्ये वन डे क्रिकेटमध्ये झोकात पदार्पण करणार्‍या मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकरच्या वन डे कारकिर्दीला पूर्णविराम लागला. बीसीसीआय अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात सचिननं हा निर्णय कळवला.

"मी वन डे क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय. वर्ल्ड कप विजयी टीमचा भाग होण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालंय. 2015 च्या वर्ल्ड कपची तयारी ही आत्तापासून सुरू व्हायला हवी. मी टीम इंडियाला त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देतो. माझ्यावर मनापासून प्रेम करण्यासाठी आणि मला सदैव पाठिंबा देण्यासाठी मी माझ्या सर्व क्रिकेटप्रेमींचे मनापासून आभार मानतो. " – सचिन तेंडुलकर

वन डे क्रिकेटची सगळी परिमाणं सचिननं बदलली. सचिन आल्यापासून ओपनिंगची गणितं बदलली. जगातील सर्वोत्तम बॉलिंग ऍटॅकचा चांगलाच समाचार त्यानं घेतला. वन डे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक रन करण्याचा रेकॉर्ड सचिननं केला. वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक रन्स त्यानं ठोकले. वन डे क्रिकेटच्या इतिहासात डबल सेंच्युरी करणारा पहिला क्रिकेटर ठरला आणि इतकचं नाही तर टीम इंडियाला वन डे क्रिकेटमध्ये इतिहासात हा क्षण दाखवण्यातही त्याचं योगदान मोलाचं राहिलंय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद त्याच्या अश्रूंमधून जाणवला.

पण गेल्या काही महिन्यात सचिनच्या फॉर्मवरुन त्याच्या वन डेमधील भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. वर्ल्ड कप जेतेपदानंतर त्यानं वन डे क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला यावरुनही भुवया उंचावल्या गेल्या. पण वन डेमॅचमध्येच सचिननं सेंच्युरीची सेंच्युरी पूर्ण केली. सचिनच्या वन डे करिअरमधील हा सर्वोच्च क्षण होता. घरच्या मैदानावर आपल्या प्रेक्षकांसमोर त्याच्या साथीदारांनी त्याला खांद्यावर उचलून घेतलं. आणि सचिनच्या वन डे क्रिकेटमधील योगदानाला सलाम केला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हा एक अजरामर क्षण होता.

close