‘हिसाब बराबर’,भारताचा विजय

December 28, 2012 3:03 PM0 commentsViews: 128

27 डिसेंबर

अहमदाबादमध्ये झालेल्या दुसर्‍या टी 20 मॅचमध्ये भारताने पराभवाचा वचपा काढत पाकिस्तानवर 11 धावांनी विजय मिळवलाय. भारताने दिलेल्या 193 धावांचा पाठलाग करत पाक संघ 181 धावांवर गारद झाला. भारताकडून युवराज सिंगच्या तडाकेबाज बॅटिंग आणि अशोक डिंडाच्या भेदक गोलंदाजीपुढे पाक टीमला लोटांगण घ्यावे लागले. दोन सामन्याची टी 20 सिरीज 1-1 अशी बरोबरीत सुटलीय.भारत विरूद्ध पाकिस्तान मॅचचा थरार आज गुजरातवासीयाना अनुभवायला मिळाला. पहिली टी 20 मॅच गमावल्यानंतर अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान दरम्यान दुसरी आणि शेवटची टी 20 मॅच पार पडली. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊन भारताला फलंदाजीची संधी दिली. भारताने निर्धारीत 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावत 192 धावांचा मोठा स्कोअर उभा केला.. भारताने पाकला 193 धावांचे आव्हान दिले. गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणे या ओपनिंग जोडीने धडाकेबाज सुरूवात केली. मात्र 21 रन्सवर गौतम गंभीरला उमर गुलने एलबीडब्ल्यू आऊट केलं. त्यापाठोपाठ अजिंक्य रहाणेची कॅच घेऊन गुलने रहाणेला तंबूत पाठवलं. त्यानंतर आलेल्या विराट कोहली आणि युवराज सिंगने टीम इंडियाची बाजू सावरली. युवराजने धडाकेबाज बॅटिंग करत 36 बॉलमध्ये 72 रन्स केले यात 4 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे. युवराजच्या या धडाकेबाज बॅटिंगच्या जोरावर टीम इंडियाने पाकविरोधात सर्वाधिक 192 धावांचा स्कोअर रचला. विराट कोहली 27 रन्स तर महेंद्र सिंग धोणी 33 रन्सवर आऊट झाला.

भारताने दिलेल्या आव्हानाला पाक टीमनेही तोडीचं प्रतिउत्तर दिलं. नसीर जमशेद आणि अहम्मद शेहजाद या ओपनिंग जोडीने सावध सुरूवात करत 74 धावांची पार्टनशिप केली. पण रविचंद्र अश्विनने नसीरला 41 धावांवर आऊट करत तंबूचा रस्ता दाखवला. तर युवराज सिंगने आपल्या बॉलिंगची जादू दाखवतं अहम्मद शेहजादला आऊट केलं. त्यानंतर आलेल्या उमर अकमल आणि कर्णधार मोहम्मद हाफिजने कॅप्टन इनिंग खेळी करत टीमला सावरण्याचा प्रयत्न केला. हाफिजने पाक टीमकडून सर्वाधिक 55 धावा केल्या. पण अशोक डिंडाच्या भेदक बॉलिंगमुळे पाकच्या मध्यल्या फळीची धुवा उडाला. अशोक डिंडाने हाफिज, उमर आणि कमरनाची विकेट घेत पाकला लोटांगण घेण्यास भाग पाडलं. पहिल्या मॅचमध्ये सर्वाधिक विकेट घेणार्‍या भुवनेश्वर कुमारने 1 विकेट खिशात घातली. तर ईशांत शर्मा,रविचंद्र आश्विन,युवराज सिंग यांनी प्रत्येकी एक-एक विकेट कमावल्यात. विशेष म्हणजे या मॅचला गुजरातचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, अभिनेते परेश रावल यांनी हजेरी लावली होती.

close