पिंपरीत महिलांसाठी कराटे प्रशिक्षण, 24 तास हेल्पलाईन

January 2, 2013 4:37 PM0 commentsViews: 28

02 जानेवारी

महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांतर्फे महिलांसाठी एक विशेष उपक्रम सुरू करण्यात आला. महिलांसाठी मोफत कराटे प्रशिक्षण वर्ग, चौवीस तास हेल्पलाईन सेवा तसंच शाळा आणि महाविद्यालयांसाठी भरारी पथक स्थापन करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कराटेपटू सोनाली बडवे कोणतंही मानधन न घेता महिलांना मार्गदर्शन करणार आहे. पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी आज या उपक्रमाची माहिती दिली.

देशातील महिलांच्याबाबतीत घडलेल्या विविध अप्रिय घटनामुळे पिंपरी – चिंचवड शहरातील महिलांसाठी मोफत प्रशिक्षणवर्ग, स्वतंत्र अशी चौवीस तास हेल्पलाईन आणि शाळा महाविद्यालयांसाठी भरारी पथक आदी उपक्रम पोलिसांनी सुरु केले आहे. दोन वेळा आंतराराष्ट्रीय, वीस वेळा राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धामध्ये नैपुण्य दाखविणारी सोनाली बडवे ही कोणतेही मानधन न घेता मार्गदर्शन करणार आहे. पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी हा उपक्रम सुरु होत असल्याचे जाहीर केले. बर्‍याचदा तक्रार करतांना बदनामी होईल या भीतीने महिला पुढे येत नाहीत. महिला आणि मुलींना कोणतीही भीती न बाळगता थेट तक्रार करण्यासाठी पुढे यावे यासाठी स्वतंत्र क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. त्यावर तक्रार करणार्‍यांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. पिंपरी पोलीस ठाण्याच्या शेजारील मैदानावर पाच जानेवारीपासून सायंकाळी सहा ते आठ या वेळेत कराटे प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येणार आहे.

close