चिपळूण संमेलन उधळून लावण्याचा संभाजी बिग्रेडचा इशारा

January 4, 2013 5:28 PM0 commentsViews: 24

04 जानेवारी

चिपळूण येथे होऊ घातलेलं 86 वं अखिल भारतीय साहित्य संमेलनावर परशुरामाचीच कुर्‍हाड कोसळलीये. साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर परशुरामचं चित्र आणि कुर्‍हाडीसारख्या परशू या शस्त्राचंही चित्र छापण्यात आलंय. पण परशुराम हे ब्राम्हणांचं प्रतीक आहे, असं म्हणत संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतलाय. परशुरामाचं आणि परशूचं चित्र काढलं नाही तर आम्ही हे संमेलन उधळून लावू असा कडक इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय.86 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन आता काही दिवसांवर येऊन ठेपलं असता एका नव्या वादात अडकलं आहे. संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत परशुरामाचं चित्र आणि त्यांची कुर्‍हाड छापण्यात आली आहे. संभाजी बिग्रेडने परशुरामाच्या फोटोवर आक्षेप घेतला आहे. दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर महिला अबला की सबला अशी चर्चा सुरू असताना महिलांचा हत्यारा असलेल्या परशुरामाचा फोटो संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर का छापण्यात आला ? असा सवाल संभाजी बिग्रेडचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी विचारलाय. तसंच फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने राज्याचा कारभार केला जातोय तर दुसरीकडे परशुरामाच्या चित्राआड विषमतावाद का निर्माण केला जात आहे. परशुरामाचा फोटो का छापण्यात आला याचा खुलासा निमंत्रकांनी करावा अशी मागणीही गायकवाड यांनी केली. तसंच संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड फक्त फुले शाहू विचाराच्या चेहर्‍यासाठी करण्यात आली असा आरोपही गायकवाड यांनी केला. संभाजी बिग्रेडने या अगोदरही ह.मो.मराठे यांच्या पत्रिकेवर आक्षेप घेतला होता. या प्रकरणी ह.मो.मराठेंना अटक आणि जामीन मिळाला होता. याप्रकरणी मराठेंनी जाहीर माफी सुद्धा माफी मागितली होती. या प्रकरणामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मराठेंचा पराभव झाला आणि डॉ. नागनाथ कोतापल्ले यांची निवड झालीय. चिपळूणमधल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने या साहित्य संमेलनाचं आयोजन केलंय. साहित्य संमेलनाच्या परिसरात परशुरामाचा पुतळा उभारण्याचाही प्रस्ताव आहे. 11, 12 आणि 13 जानेवारीला हे संमलेन भरणार असून नागनाथ कोत्तापल्ले अध्यक्ष आहेत.

close