बलात्कार्‍याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित

January 7, 2013 4:33 PM0 commentsViews: 15

07 जानेवारी

नवी दिल्लीमधल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी पुढे येत असतानाच पुण्यामध्ये 2007 मध्ये झालेल्या एका घटनेतल्या आरोपीला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. हा निकाल अतिशय धक्कादायक असून त्याचा पुनर्विचार करावा यासाठी याचिका दाखल करणार असल्याचं पीडित कुटुंबियांनी सांगितलंय. पुण्यात 2007 मध्ये आरोपी संदेश अभंगनं शालिनी उद्धवराव जाधव (वय ६६) या वृद्धेची हत्या करून तिच्या गर्भवती नातसुनेवर बलात्कार करून हल्ला केला होता.

पुण्यात 2007 मध्ये बिबवेवाडी मध्ये ही घटना घडली होती. भर दुपारी संदेश अभंग (वय 23) या नराधामाने मॅकॅनिक असल्याचं सांगून गाडी रिपेअर करण्याच्या बहाण्याने पीडित महिलेच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या 65 वर्षीय महिलेने तिच्या नातवाला याविषयी फोन करून विचारण्याचा प्रयत्न केला असता अभंग याने अचानक या महिलेवर चाकूने हल्ला करुन 21 वेळा भोसकलं. त्यात तिच्या एका हाताचं मनगट तर दुसर्‍या हाताची बोटं कापली गेली. या प्रकारामुळे ती महिला जागीच कोसळली. त्यानंतर त्याने घरातील या महिलेच्या गर्भवती असलेल्या नातसुनेवर बलात्कार केला. आपण कोणतेही पुरावे मागे सोडत नसल्याचं सांगत त्याने तिच्यावरही तब्बल 19 वेळा वार केले. आणि त्यानंतर तिचा गळाही चिरला. आपल्या बाळाला वाचवण्यासाठी तिने पाठीवर हे सगळे वार झेलेले होते. याप्रकरणामध्ये संदेश अभंग या आरोपीला सेशन आणि उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

मात्र 13 डिसेंबरला दिलेल्या निकाला मध्ये उच्च न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ज्या पद्धतीने हा खून झाला त्यावेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत असण्याची शक्यता आहे असं म्हणत न्या.स्वतंत्र कुमार आणि मदन लोकुर यांच्या खंडपीठाने ही शिक्षा सुनावली. या घटनेची परिस्थिती लक्षात घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात अपील करणार असल्याचं पीडित कुटुंबाने म्हटलंय. त्याबरोबरच ही घटना ही फक्त एक घटना नसून त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आरोपी मद्यधुंद अवस्थेत असण्याचा फायदा देणारा निर्णय जर सर्वोच्च न्यायालय देत असेल तर त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांच्या निकालावरच परिणाम होईल, आरोपींना फाशीच सुनावली जायला हवी अशी मागणी माजी सरकारी वकिल डी.वाय जाधव यांनी केली आहे.

close