पहिला ‘रेस’ बरा होता…

January 25, 2013 1:59 PM0 commentsViews: 18

अमोल परचुरे,समीक्षक

25 जानेवारी

'रेस टू' अर्थात 2008 साली रिलीज झालेल्या 'रेस' चा सिक्वेल आहे. मूळ सिनेमा आणि सिक्वेल यांचा हल्ली फारसा काही संबंध नसतो, तरी त्याला सिक्वेल म्हणायचं असतं, असं बॉलीवूडनं ठरवून टाकलंय. दुसर्‍या रेसमध्ये सुध्दा पहिल्या रेसचे अगदीच थोडेफार संदर्भ आहेत, पण पहिल्या आणि दुसर्‍या सिनेमांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. पण स्टाईल तीच, सस्पेन्स तसाच आहे. अब्बास-मस्तानचं टेकिंगही तसंच आहे. फक्त तरीही पहिला रेस जास्त बरा होता असंच दुसरा रेस बघून वाटतं. खरंतर, एखाद्या मसाला फिल्ममध्ये जे काही असतं ते सगळं यात आहे. या रेसमध्ये तर जॉन अब्राहम, सैफ अली खान, दिपिका पदुकोण, अनिल कपूर, जॅकलीन, अमिषा पटेल एवढे सगळे स्टार्स यात आहेत. गाड्या उडवण्याचे स्टंट आहेत, बिकीनीत नाचणार्‍या हिरॉईन्स आहेत, कॅसिनोमधला गोलमाल आहे, अनिल कपूरची डबल मिनिंग कॉमेडी आहे. सिक्स पॅक ऍब्ज दाखवत हिरो लोकांची फ्री स्टाईल फायटिंग आहे. हाय प्रोफाईल चोर्‍या आहेत, आलिशान यॉटवरच्या पाटर्‌या आहेत, एकाच प्रकारे गाणी गाऊनही लोकप्रिय झालेल्या आतिफचं गाणंही आहे. एकंदरित डोळे दिपवून टाकणारं जे जे काही असतं ते सगळं या एकाच सिनेमात अब्बास-मस्तान यांनी दिलेलं आहे. पण हा डोस एवढा जास्त झालाय की इंटरव्हलनंतर त्याचा कंटाळाच यायला लागतो.

या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत अब्बास-मस्तान… मोठमोठे स्टार्स, आपण अंदाजही करू शकणार नाही अशा वेगाने बदलत जाणारी सिनेमाची कथा, संशयाची सुई कधी याच्यावर कधी त्याच्यावर असं करता करता गुन्हेगार कोणीतरी भलताच असणार अशी अब्बास-मस्तान यांच्या सिनेमांची खासियत. मग अगदी खिलाडी, बाजीगर पासून ते गेल्यावर्षी आलेल्या प्लेअर्सपर्यंत..रेस टू मध्येसुध्दा असंच घडतं. इंटरव्हलपर्यंत बरेच ट्विस्ट येतात आणि त्यातले काही ट्विस्ट विचारपूर्वक केलेले वाटतात. इथे सैफ अली खान आणि जॉन अब्राहम हे दोन महत्वाचे खिलाडी आहेत, दोघेही एकमेकांवर मात करुन बाजीगर बनण्यासाठी धडपडत असतात. या सिनेमात अब्बास-मस्तानचे सगळे फॉर्म्युले आहेत. 'हारकर जीतनेवाले को ही बाजीगर कहते है' हा ऍटीट्यूडही सिनेमात आहे आणि 'तुमसेभी ज्यादा हमें पैसे से प्यार है' असं हिरॉईनला सांगणारा जॉन अब्राहम पण इथं आहे. उडत्या विमानात कारची घुसखोरी आहे आणि तेच विमान कोसळत असताना त्याच कारमधून सुखरुप जमिनीवर येणारे हिरो-हिरोईनही आहेत. एकूण काय, बर्‍याच अतर्क्य गोष्टी या सिनेमात आहेत.

आता मसाला सिनेमे म्हटलं की, अतर्क्य गोष्टी या असणारच पण रेस 2 मधल्या लॉजिक नसलेल्या गोष्टी बघूनच इंटरव्हलनंतर हळूहळू आपण जांभया वगैरे द्यायला लागतो. आता एवढे 'कॉन मुव्हीज' गेल्या काही काळात आलेले आहेत, त्यामुळे रेस 2 मध्ये होणार्‍या डोकेबाज चोर्‍या बघून अजिबात लेखक-दिग्दर्शकाचं कौतुक वाटत नाही. बरं, शेवटाचाही अंदाज आपल्याला आलेला असतो. कोणी कितीही जागेवर पलटी मारली, म्हणजे कधी या हिरोसोबत किंवा कधी त्या हिरोसोबत अशी बाजू बदलत असलं तरी त्यातही फार नावीन्य नाही. अभिनयाचं म्हणाल तर जॉन अब्राहम एकाच चेहर्‍यानं पूर्ण सिनेमात दिसतो, सैफ अली खान तर 'एजंट विनोद'च वाटतो. दीपिका पदुकोणनं सुंदर दिसण्याबरोबरच चांगला अभिनयही केला. बाकी जॅकलीन आणि अमिषा पटेल यांनी जेवढं आणि जसं जमेल तसं काम केलेलं आहे. सगळ्यात भाव खाऊन गेलाय तो झकास अनिल कपूर..जोडीला डबल मिनिंगचा तडका तर आहेच आणि 'सब्र का फल मीठा होता है, वैसेही सबेरे का फल भी मीठा होता है' असे पीजे सुध्दा आहेत.

रेस 2 मधली एकमेव चांगली गोष्ट म्हणजे धमाकेदार संवाद… किरण कोटरियाल यांनी लिहीलेले संवाद एकदम जबरदस्तच आहेत. काही ठिकाणी थोडक्या संवादातूनही चांगला परिणाम साधलेला आहे. थोडक्यात या सिनेमाबद्दल सांगायचं म्हणजे इंटरव्हलपर्यंत 'फुल्ल टू एंटरटेनर' असलेला हा सिनेमा इंटरव्हलनंतर मात्र निराशा करतो तरीही ऍक्शन, सस्पेन्स आणि अतर्क्य स्टंटचे चाहते असाल तर तुम्ही हा सिनेमा एंजॉयही करु शकता..

रेस 2 ला रेटिंग – 50

close